योहान 17

17
येशू गौरविले जाण्यासाठी प्रार्थना करतात
1हे म्हटल्यावर, येशूंनी वर आकाशाकडे दृष्टी लावून प्रार्थना केली:
“हे पित्या, वेळ आली आहे, आपल्या पुत्राचे गौरव करा, यासाठी की पुत्राने आपले गौरव करावे; 2आपण त्याला सर्व लोकांवर अधिकार दिला आहे, ते यास्तव की ज्यांना तुम्ही त्याच्याकडे सोपविले आहे, त्या सर्वांना त्याने सार्वकालिक जीवन द्यावे. 3आता सार्वकालिक जीवन हेच आहे: जे तुम्ही एकच सत्य परमेश्वर आहात त्या तुम्हाला व ज्यांना तुम्ही पाठविले, त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे. 4तुम्ही दिलेले कार्य समाप्त करून मी तुम्हाला पृथ्वीवर गौरव प्राप्त करून दिले आहे. 5तर आता, हे पित्या, जग स्थापन होण्यापूर्वी जे माझे गौरव तुमच्या समक्षतेत होते त्याच्यायोगे माझे गौरव करा.
येशू शिष्यांसाठी प्रार्थना करतात
6“तुम्ही मला या जगातील जे लोक दिले, त्यांच्यासमोर मी तुम्हाला#17:6 किंवा तुमचे नाव प्रगट केले आहे. ते तुमचे होते; तुम्ही ते सर्वजण मला दिले आणि त्यांनी तुमचे वचन पाळले आहे. 7आता त्यांना कळले आहे की, जे काही तुम्ही मला दिले आहे ते तुमच्यापासून आहे. 8कारण तुम्ही मला दिलेली वचने मी त्यांना दिली आणि त्यांनी ती स्वीकारली आहेत. त्यांना खात्रीपूर्वक समजले की मी तुमच्यापासून आलो आणि तुम्ही मला पाठविले आहे. 9मी त्यांच्यासाठी प्रार्थना करीत आहे. मी जगासाठी प्रार्थना करीत नाही, परंतु जे तुम्ही मला दिले आहेत आणि ते आपले आहेत त्यांच्यासाठी करतो. 10जे सर्व माझे आहेत ते तुमचेच आहेत आणि जे सर्व तुमचे आहेत ते माझे आहेत आणि त्यांच्याद्वारे मला गौरव मिळाले आहे. 11आता मी या जगात राहणार नाही, मी तुमच्याकडे येत आहे, परंतु ते या जगात अजूनही आहेत. पवित्र पित्या, जे नाव तुम्ही मला दिले आहे, त्या नावाच्या सामर्थ्याने त्यांना सुरक्षित ठेवा,#17:11 किंवा त्यांना विश्वासू ठेवा यासाठी की जसे आपण एक आहोत तसे त्यांनी एक व्हावे. 12जोपर्यंत मी त्यांच्याबरोबर होतो, तोपर्यंत जे नाव तुम्ही मला दिले, त्याद्वारे मी त्यांना राखले व सुरक्षित ठेवले#17:12 किंवा विश्वासू ठेवले आणि जो नाशाचा पुत्र आहे त्याच्याशिवाय एकाचाही नाश झाला नाही, यासाठी की शास्त्रलेख पूर्ण व्हावा.
13“आता मी तुमच्याकडे येत आहे, परंतु मी या जगात असतानाच हे सांगत आहे, यासाठी की माझा आनंद त्यांच्यामध्ये परिपूर्ण व्हावा. 14मी त्यांना तुमचे वचन सांगितले आहे आणि जगाने त्यांचा द्वेष केला, कारण जसा मी जगाचा नाही तसे तेही या जगाचे नाहीत. 15तुम्ही त्यांना जगातून काढून घ्यावे यासाठी मी प्रार्थना करीत नाही, परंतु त्यांचे दुष्टापासून रक्षण करावे. 16जसा मी या जगाचा नाही तसे तेही या जगाचे नाहीत.” 17सत्याने त्यांना पवित्र करा; तुमचे वचन सत्य आहे. 18जसे तुम्ही मला जगात पाठविले, तसे मीही त्यांना जगात पाठविले आहे. 19त्यांनी देखील खरोखर पवित्र व्हावे म्हणून मी त्यांच्यासाठी स्वतःला पवित्र करतो.
येशू सर्व विश्वासणार्‍यांसाठी प्रार्थना करतात
20“माझी प्रार्थना केवळ त्यांच्यासाठीच नाही. जे त्यांच्या संदेशाद्वारे मजवर विश्वास ठेवतील मी त्यांच्यासाठी देखील प्रार्थना करतो. 21हे पित्या, तुम्ही मजमध्ये व मी तुम्हामध्ये आहे, तसेच त्या सर्वांनी एक व्हावे, म्हणजे तुम्ही मला पाठविले असा जग विश्वास ठेवेल. 22तुम्ही जे गौरव मला दिले ते मी त्यांना दिले, यासाठी की जसे आपण एक आहोत तसे त्यांनीही एक व्हावे, 23मी त्यांच्यामध्ये व तुम्ही माझ्यामध्ये यासाठी आहोत की त्यांनी एक होऊन पूर्ण व्हावे आणि त्यावरून जगाने समजून घ्यावे की, तुम्ही मला पाठविले आहे आणि जशी तुम्ही मजवर प्रीती केली तशी त्यांच्यावरही प्रीती केली आहे.
24“हे पित्या, जगाची उत्पत्ती होण्यापूर्वी तुम्ही मजवर प्रीती करून मला गौरव दिले. आता त्यांना माझे गौरव पाहता यावे म्हणून तुम्ही जे लोक मला दिले, त्यांनी जिथे मी आहे, तिथे माझ्याजवळ असावे अशी माझी इच्छा आहे.
25“हे नीतिमान पित्या, जग तुम्हाला ओळखत नाही, परंतु मी तुम्हाला ओळखतो आणि तुम्ही मला पाठविले हे त्यांना समजले आहे. 26मी तुमच्या नाव त्यांच्यासमोर प्रकट केले आहे, मी तुम्हाला प्रकट करीतच राहीन, जेणे करून जी तुमची प्रीती मजवर आहे ती त्यांच्यामध्ये असावी आणि मी त्यांच्यामध्ये असावे.”

高亮显示

分享

复制

None

想要在所有设备上保存你的高亮显示吗? 注册或登录