नीतिसूत्रे 27
27
1उद्याविषयी आज बढाई मारू नका;
कारण उद्या काय घडेल ते तुम्हाला ठाऊक नाही.
2दुसरा कोणीतरी तुमची स्तुती करो, तुमच्या स्वतःच्या मुखाने नको;
बाहेरील व्यक्तीला ती करू द्या, पण तुम्ही स्वतःच्या ओठांनी करू नये.
3दगड जड आहे आणि वाळू वजनदार असते,
परंतु मूर्खाने दिलेली चिथावणी या दोन्हींपेक्षाही जड असते.
4क्रोध क्रूर असतो आणि राग पूरासमान असतो;
पण मत्सरापुढे कोण उभा राहू शकेल?
5उघडपणे कान उघाडणी करणे,
गुप्त प्रीतीपेक्षा चांगले आहे.
6मित्राने केलेले घाव विश्वासयोग्य असतात,
परंतु शत्रूची अनेक चुंबने कपटी होत.
7एखाद्याला भरल्यापोटी मधसुद्धा बेचव लागतो,
परंतु भुकेल्या मनुष्याला कडू अन्नसुद्धा गोड लागते.
8घर सोडून भटकणारा मनुष्य
घरटे सोडून भटकणार्या पक्ष्यासारखा आहे.
9अत्तर आणि सुगंध मनाला आनंद देतात,
आणि अंतःकरणापासून दिलेल्या सल्ल्यातून
मित्राचा आनंद उसळून येतो.
10तुमचा मित्र किंवा तुमच्या कुटुंबाच्या मित्राला कधीही सोडू नका,
आणि संकटसमयी नातेवाईकांच्या घरी जावू नका—
दूर राहणाऱ्या नातेवाईकांपेक्षा जवळचा शेजारी बरा.
11माझ्या मुला, शहाणा हो आणि माझे हृदय आनंदित कर;
म्हणजे जे मला तिरस्काराने वागवितात, मी त्यांना उत्तर देऊ शकेन.
12सुज्ञ मनुष्य धोका ओळखतो आणि आश्रयास जातो,
परंतु भोळा मनुष्य पुढे जात राहतो आणि दंड भोगतो.
13जो अनोळखी व्यक्तीला जामीन राहतो त्याचे वस्त्र काढून घे;
जर ते परक्यासाठी केले असेल तर ते गहाण म्हणून घे.
14जर कोणी आपल्या शेजाऱ्याला भल्या पहाटे ओरडून अभिवादन केले,
तर ते त्याला शापासारखे वाटेल.
15भांडखोर पत्नी ही पावसाळ्यात
गळक्या छप्परासारखी आहे.
16तिला ताब्यात ठेवणे म्हणजे वार्याला ताब्यात ठेवण्यासारखे,
किंवा हाताने तेल धरण्याचा प्रयत्न करण्यासारखे आहे.
17जशी लोखंडाने लोखंडाला धार लागते,
त्याप्रमाणे एक मनुष्य दुसर्याला सुधारतो.
18जो अंजिराच्या झाडाची राखण करतो, तो त्या झाडाचे फळ खाईल.
आणि जे त्यांच्या मालकाचे संरक्षण करतात त्यांचा सन्मान होईल.
19पाणी जसे चेहर्याचे प्रतिबिंब दर्शविते,
तसेच व्यक्तीचे जीवन त्याचे अंतःकरण दर्शविते,
20मृत्यू आणि विध्वंस यांचे कधीही समाधान होत नाही,
तसेच मनुष्याच्या नेत्रांचेही नव्हे.
21चांदी मुशीत आणि सोने भट्टीत पारखले जाते,
तशी लोकांची पारख, त्यांच्या प्रशंसेद्वारे होते.
22मूर्खाचा तुम्ही कुटणीमध्ये भुगा केला,
मुसळात त्याला धान्यासारखे भरडले,
तरी त्याची मूर्खता तुम्हाला वेगळी करता येणार नाही.
23आपल्या कळपाच्या स्थितीची योग्य जाणीव ठेवा,
तुमच्या पशूंकडे काळजीपूर्वक लक्ष द्या;
24कारण संपत्ती सर्वकाळ टिकत नाही,
आणि मुकुट पिढ्यान् पिढ्या सुरक्षित नसतो.
25वाळलेले गवत काढून टाकले तेव्हा नवीन वाढ दिसून येते
आणि टेकड्यांवरील गवत एकत्रित केले जाते,
26तेव्हा मेंढ्या तुम्हाला कपडे पुरवतील,
आणि शेतातील पैशाने शेळ्या मिळतील.
27तुझ्या कुटुंबाला खाण्यासाठी आणि तुझ्या दासींचे पोषण करण्यासाठी
तुझ्याकडे शेळ्यांचे पुष्कळ दूध असेल.
Currently Selected:
नीतिसूत्रे 27: MRCV
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.