YouVersion Logo
Search Icon

नीतिसूत्रे 28

28
1कोणीही पाठलाग करीत नाही, तरी दुष्ट माणसे पळत असतात;
पण नीतिमान सिंहासारखे निर्भय असतात.
2जेव्हा एखादे राष्ट्र बंडखोर असते, तेव्हा तिथे अनेक शासक असतात,
परंतु विवेकशील आणि ज्ञानी शासक#28:2 शासनकर्ता म्हणजे मनुष्य सुव्यवस्था कायम ठेवतो.
3गरीब लोकांवर जुलूम करणारा पुरुष,
संपूर्ण पीक वाहून नेणार्‍या घनघोर वृष्टिसारखा आहे.
4नियमशास्त्राचा तिरस्कार करणारे दुर्जनांची स्तुती करतात,
परंतु ते पालन करणारे, त्यांचा विरोध करतात.
5योग्य ते काय आहे हे दुष्टकर्म करणाऱ्यांना समजत नाही,
परंतु जे याहवेहचा शोध घेतात, त्यांना ते पूर्णपणे समजते.
6विकृत मार्गावर चालणाऱ्या श्रीमंत माणसापेक्षा
प्रामाणिकपणाने चालणारा गरीब मनुष्य बरा.
7सुज्ञ पुत्र शिक्षणाकडे लक्ष लावतो,
परंतु खादाडांची संगत करणारा पुत्र त्याच्या वडिलांचा अब्रू घालवितो.
8जो गरिबांकडून व्याज किंवा फायदा घेऊन संपत्ती वाढवितो,
ती दुसर्‍याकरिता साठवितो, जो गरिबांवर दया दाखवेल.
9जर कोणी माझ्या नियमशास्त्राकडे कानाडोळा केला,
तर त्यांच्या प्रार्थनासुद्धा तिरस्करणीय वाटतात.
10जे कोणी नीतिमानाला वाईट मार्गाकडे घेऊन जातात,
ते स्वतःच्याच जाळ्यात सापडतील,
परंतु निर्दोष माणसांना उत्तम वारसा मिळेल.
11श्रीमंत माणसे त्यांच्या दृष्टीने स्वतःला शहाणे समजतात;
परंतु जो गरीब आणि विवेकी आहे तो पाहतो की श्रीमंत कसे भ्रमात पडलेले आहेत.
12नीतिमान यशस्वी झाला तर हर्षोल्हास केला जातो;
पण दुष्ट प्रबल झाले असता लोक स्वतःस लपवून ठेवतात.
13जो कोणी त्याचे पाप झाकून ठेवतो, तो समृद्ध होत नाही,
परंतु जो अपराध कबूल करून ते करण्याचे सोडून देतो त्याला कृपा प्राप्त होते.
14परमेश्वराबद्दल नेहमी भय बाळगणारा मनुष्य धन्य,
परंतु मन कठोर करणारा संकटात सापडतो.
15असहाय लोकांवर राज्य करणारा दुष्ट राजा
गर्जणार्‍या सिंहासारखा किंवा आक्रमक अस्वलासारखा असतो.
16जुलमी शासनकर्ता खंडणी वसूल करतो,
परंतु जो कुमार्गाने मिळविलेल्या लाभाची घृणा करतो, तो पुष्कळ वर्षे राज्य करेल.
17मनावर खुनाच्या दोषाचे ओझे असलेला यातनाग्रस्त मनुष्य
कबरेमध्ये आसरा शोधेल;
त्याला कोणीही थांबवू नये.
18जो निर्दोषपणाने जीवन जगतो तो सुरक्षित राहतो,
परंतु ज्याचे मार्ग विकृत आहेत तो खड्ड्यात पडेल.
19जे आपल्या जमिनीची मशागत करतात, त्यांना विपुल अन्न प्राप्त होईल,
परंतु जे काल्पनिक गोष्टींच्या मागे धावतात त्यांच्यावर दारिद्र्य येईल.
20प्रामाणिक मनुष्याला भरपूर आशीर्वाद मिळेल,
पण झटपट श्रीमंत होण्याची इच्छा धरणारा दंडापासून अलिप्त राहणार नाही.
21पक्षपात करणे हे चांगले नाही—
तरीही भाकरीच्या एका तुकड्यासाठी मनुष्य चुकीची गोष्ट करतो.
22कंजूष माणसे श्रीमंत होण्यासाठी उतावळे असतात
आणि त्यांना माहीत नसते की दारिद्र्य त्यांची वाट पाहत आहे.
23खोटी स्तुती करणारी जीभ असलेल्या मनुष्यापेक्षा,
एखाद्याची कान उघाडणी करणारा, शेवटी कृपा प्राप्त करेल.
24जो आपल्या आईवडिलांना लुबाडतो
आणि म्हणतो, “ते चुकीचे नाही,”
तो नाश करणार्‍याचा भागीदार आहे.
25लोभी मनुष्य भांडणे लावतो,
परंतु जे याहवेहवर भरवसा ठेवतात त्यांची भरभराट होईल.
26स्वतःवरच भरवसा ठेवणारा मनुष्य मूर्ख आहे.
पण शहाणपणाने वागणारे सुरक्षित राहतील.
27जे गरिबांना दान देतात, त्यांना कशाचीही कमतरता पडणार नाही,
परंतु त्यांच्या गरजांकडे डोळेझाक करणार्‍यांवर पुष्कळ शाप येतील.
28जेव्हा दुर्जन सामर्थ्यवान होतात, तेव्हा लोक लपून बसतात;
परंतु दुष्टांचा नायनाट झाला कि नीतिमान वृद्धी पावतात.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in