YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 5

5
संरक्षणासाठी प्रार्थना
मुख्य गवयासाठी; वाजंत्र्यांच्या साथीने गायचे दाविदाचे स्तोत्र.
1हे परमेश्वरा, माझ्या बोलण्याकडे कान दे, माझ्या चिंतनाकडे लक्ष दे.
2हे माझ्या राजा, माझ्या देवा, माझ्या धाव्याच्या वाणीकडे कान दे; मी तुझी प्रार्थना करीत आहे.
3हे परमेश्वरा, प्रातःकाळी तू माझी वाणी ऐकतोस; सकाळी मी प्रार्थना व्यवस्थित रचून तुला सादर करीन, आणि तुझी प्रतीक्षा करीत राहीन.
4कारण तू दुष्टाईची आवड धरणारा देव नाहीस; दुष्टपणाला तुझ्याजवळ थारा नाही.
5तुझ्या दृष्टीपुढे बढाई मारणारे टिकणार नाहीत, सर्व कुकर्म करणार्‍यांचा तुला तिटकारा आहे.
6असत्य भाषण करणार्‍याचा तू नाश करतोस; खुनी व कपटी मनुष्याचा परमेश्वराला वीट येतो.
7मी तर तुझ्या अपार कृपेने तुझ्या घरात येईन; तुझी भीड धरून तुझ्या पवित्र मंदिराकडे तोंड करून दंडवत घालीन.
8हे परमेश्वरा, माझ्यासाठी शत्रू टपले आहेत, म्हणून तू मला आपल्या नीतिमार्गाने ने, आपला मार्ग माझ्यापुढे नीट कर.
9त्यांच्या तोंडाचा भरवसा नाही; त्यांचे अंतर्याम केवळ खाच आहे; त्यांचा घसा केवळ उघडे थडगे आहे; ते आपल्या जिभेने गोडगोड बोलतात.
10हे देवा, त्यांना दोषी ठरव; ते आपल्या मसलतींत फसोत; त्यांच्या अनेक अपराधांबद्दल त्यांना झुगारून दे, कारण ते तुला जुमानत नाहीत;
11परंतु तुझा आश्रय करणारे सारे हर्ष करोत; त्यांचे तू रक्षण करतोस म्हणून ते सदा गजर करोत; ज्यांना तुझे नाव प्रिय आहे ते तुझ्या ठायी उल्लास पावोत.
12कारण तूच नीतिमानाला आशीर्वाद देतोस; हे परमेश्वरा, तू त्याच्याभोवती कवचाप्रमाणे कृपेचे वेष्टन घालतोस.

सध्या निवडलेले:

स्तोत्रसंहिता 5: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन