प्रकटी 11
11
दोन साक्षीदार
1नंतर काठीसारखी एक मोजपट्टी मला देण्यात आली व सांगण्यात आले, “जा, देवाचे मंदिर, वेदी ह्यांचे माप घे आणि तिथे उपासना करणाऱ्यांची गणती कर. 2मात्र मंदिराबाहेरचे अंगण सोड, त्याचे माप घेऊ नकोस. कारण ते यहुदीतर लोकांना दिले आहे. ते लोक बेचाळीस महिने पवित्र नगरी तुडवतील. 3मी माझे दोन साक्षीदार पाठवीन आणि ते गोणपाट पांघरून त्या एक हजार दोनशे साठ दिवसांत संदेश घोषित करतील.”
4पृथ्वीच्या प्रभूसमोर उभे असणारे दोन ऑलिव्ह वृक्ष व दोन समया हे ते साक्षीदार आहेत. 5त्यांना कोणी उपद्रव करू पाहिल्यास त्यांच्या तोंडांतून अग्नी निघून त्यांच्या वैऱ्यांस खाऊन टाकतो. कोणी त्यांना उपद्रव करण्याचा प्रयत्न केल्यास त्याला ह्याचप्रमाणे ठार मारण्यात येईल. 6त्यांच्या संदेश सांगण्याच्या दिवसांत पाऊस पडू नये म्हणून आकाश बंद करावयाचा त्यांना अधिकार दिलेला आहे. पाण्याचे रक्त करण्याचा आणि वाटेल तितक्यांदा पृथ्वीला सर्व पीडांनी पीडित करण्याचा त्यांना अधिकार आहे.
7त्यांनी साक्ष देण्याचे काम पूर्ण केल्यावर अथांग विवरातून वर येणारे श्वापद त्यांच्याबरोबर लढाई करील आणि त्यांना जिंकून ठार मारील. 8जिथे त्यांच्या प्रभूला क्रुसावर चढविण्यात आले होते त्या महान नगराच्या रस्त्यावर त्यांची प्रेते पडून राहतील. ह्या नगराला प्रतीकात्मक रीत्या सदोम किंवा इजिप्त म्हटलेले आहे. 9सर्व लोक, वंश, भाषा बोलणारे आणि राष्ट्रे ती त्यांची प्रेते साडेतीन दिवस पाहतील आणि ती कबरीत ठेवू देणार नाहीत. 10त्यांच्यावरून पृथ्वीवर राहणारे आनंद व उ्रास करतील व एकमेकांस भेटी पाठवतील, कारण त्या दोघा संदेष्ट्यांनी पृथ्वीवर राहणाऱ्यांस पीडा दिली होती. 11पुढे साडेतीन दिवसांनंतर जीवनदायक आत्मा देवापासून येऊन त्यांच्यामध्ये संचारला, तेव्हा ते आपल्या पायांवर उभे राहिले आणि ज्यांनी त्यांना पाहिले त्यांचा थरकाप उडाला. 12तेव्हा स्वर्गातून निघालेली उच्च वाणी त्यांनी त्यांच्याबरोबर बोलताना ऐकली, ती म्हणाली, “इकडे वर या.” मग ते मेघारूढ होऊन त्यांच्या वैऱ्यांच्या देखत स्वर्गात वर गेले. 13त्याच घटकेस भीषण भूकंप झाला. तेव्हा त्या शहराच्या दहाव्या भागाचा विध्वंस झाला. भूकंपाने सात हजार माणसे ठार झाली आणि बाकीचे भयभीत होऊन त्यांनी स्वर्गातील देवाचा गौरव केला.
14दुसरा अनर्थ होऊन गेला आहे. परंतु पाहा, तिसरा अनर्थ लवकरच होणार आहे!
सातवा कर्णा
15सातव्या देवदूताने कर्णा वाजविला, तेव्हा स्वर्गात जोरदार आवाज ऐकू आले. ते म्हणाले, “जगाचे राज्य आमच्या प्रभूचे व त्याच्या ख्रिस्ताचे झाले आहे आणि तो युगानुयुगे राज्य करील!” 16तेव्हा देवासमोर आपल्या आसनावर बसलेले चोवीस वडीलजन लोटांगण घालून देवाची आराधना करीत म्हणाले,
17“हे प्रभू देवा, हे सर्वसमर्था,
तू आहेस व होतास,
तू आपले महान सामर्थ्य धारण केले आहे
आणि अधिकार हाती घेतला आहे
म्हणून आम्ही तुझे आभार मानतो.
18राष्ट्रे क्रोधाविष्ट झाली आहेत,
कारण तुझ्या क्रोधाची वेळ आली आहे.
मृतांचा न्याय करण्याची वेळ
आणि तुझे दास, संदेष्टे, तुझे पवित्र जन
व तुझ्या नावाची भीती बाळगणारे लहानथोर ह्यांना वेतन देण्याची वेळ
आणि पृथ्वीचा नाश करण्याऱ्यांचा विध्वंस करण्याची वेळ आली आहे!”
19देवाचे स्वर्गातील मंदिर उघडण्यात आले आणि त्याच्या मंदिरात त्याच्या कराराची पेटी दृष्टीस पडली, त्यानंतर विजा चमकल्या, गर्जना व मेघांचे गडगडाट झाले, भूकंप झाला व गारांची महावृष्टीही झाली.
सध्या निवडलेले:
प्रकटी 11: MACLBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi C.L. (NT), पवित्र शास्त्र
Copyright © 2018 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.