YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रकटी 12

12
स्त्री व अजगर
1नंतर स्वर्गात एक महान व रहस्यमय दृश्य दिसले. तिथे एक स्त्री दिसली. तिने सूर्यतेज पांघरलेले होते आणि तिच्या पायांखाली चंद्र व तिच्या मस्तकावर बारा ताऱ्यांचा मुकुट होता. 2ती गरोदर होती आणि वेणा देऊन प्रसूतीच्या वेदनांनी ओरडत होती.
3स्वर्गात दुसरे एक रहस्यमय दृश्य दिसले ते हे: पाहा, एक मोठा तांबूस अजगर दिसला, त्याला सात डोकी व दहा शिंगे होती आणि त्याच्या डोक्यावर सात मुकुट होते. 4त्याच्या शेपटीने त्याने आकाशातील ताऱ्यांपैकी एक तृतीयांश तारे ओढून काढले व ते पृथ्वीवर पाडले. ती स्त्री प्रसूत होईल तेव्हा तिचे मूल खाऊन टाकावे म्हणून तो अजगर त्या प्रसवणाऱ्या स्त्रीपुढे उभा राहिला. 5सर्व राष्ट्रांवर लोखंडी दंडाने राज्य करील असा पुत्र ती प्रसवली. ते तिचे मूल देवाकडे व त्याच्या राजासनाकडे हिसकावून नेण्यात आले. 6ती स्त्री रानात पळून गेली. त्या ठिकाणी तिचे एक हजार दोनशे साठ दिवस पोषण व्हावे म्हणून देवाने तयार केलेली तिची एक जागा होती.
7मग स्वर्गात युद्ध सुरू झाले, मीखाएल व त्याचे दूत अजगराबरोबर युद्ध करण्यास निघाले आणि त्यांच्याबरोबर अजगर व त्याचे दूत लढले. 8त्या वेळी अजगर व त्याचे दूत यांचे काही चालले नाही, आणि स्वर्गात त्यांचे स्थानही उरले नाही. 9तो अवाढव्य अजगर खाली फेकण्यात आला, म्हणजे सर्व जगाला ठकविणारा दियाबल व सैतान म्हटलेला तो प्राचीन साप खाली पृथ्वीवर टाकण्यात आला व त्याच्याबरोबर त्याच्या दूतांनाही टाकण्यात आले.
10नंतर मी स्वर्गात उच्च वाणी ऐकली, तिने जाहीर केले, “आता आमच्या देवाने सिद्ध केलेले तारण, त्याचे सामर्थ्य व त्याचे राज्य आणि त्याच्या ख्रिस्ताचा अधिकार प्रगट झाली आहेत! कारण आमच्या बंधूंना दोष देणारा, आमच्या देवासमोर रात्रंदिवस त्यांच्यावर दोषारोप करणारा, खाली फेकण्यात आला आहे. 11कोकराच्या रक्तामुळे व त्यांनी दिलेल्या सत्याच्या साक्षीमुळे तसेच त्यांच्यावर मरावयाची पाळी आली, तरी त्यांनी आपल्या जीवावर प्रीती केली नाही म्हणून आमच्या बंधूंना त्याच्यावर मात करता आली. 12म्हणून स्वर्गांनो व त्यांत राहणाऱ्यांनो, आनंद करा!. भूमी व समुद्र ह्यांच्यावर अनर्थ ओढवला आहे, आपला काळ थोडा आहे, हे ओळखून सैतान अतिशय संतप्त होऊन खाली तुमच्याकडे आला आहे.”
13आपण पृथ्वीवर टाकले गेलो आहोत, असे पाहून अजगराने पुत्र प्रसवलेल्या स्त्रीचा पाठलाग केला. 14त्या स्त्रीने रानात आपल्या ठिकाणाकडे उडून जावे म्हणून तिला मोठ्या गरुडाचे दोन पंख देण्यात आले होते. तेथे अजगराच्या हल्ल्यापासून सुरक्षित राहत असताना साडे तीन वर्षे तिचे पोषण केले जाणार होते. 15मग त्या स्त्रीने वाहून जावे म्हणून तिच्या मागोमाग त्या सर्पाने आपल्या तोंडातून पाण्याचा प्रवाह सोडला. 16परंतु स्त्रीला भूमीने साहाय्य केले, तिने तोंड उघडून अजगराने त्याच्या तोंडातून सोडलेले पाणी गिळून टाकले. 17तेव्हा अजगर स्त्रीवर रागावला आणि देवाच्या आज्ञा पाळणारे व येशूविषयी साक्ष देणारे तिच्या संतानांपैकी बाकीचे जे लोक होते, त्यांच्याबरोबर लढाई करण्यास तो निघून गेला. 18तिथे तो समुद्रकिनारी उभा राहिला.

सध्या निवडलेले:

प्रकटी 12: MACLBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन