स्तोत्रसंहिता 145
145
स्तोत्र 145
एक स्तवनगीत. दावीदाची रचना.
1हे माझ्या परमेश्वरा, माझ्या राजा, मी तुमचे स्तवन करेन;
तुमच्या नावाचे सदासर्वदा गुणगान करेन.
2प्रतिदिनी मी तुमचे स्तवन करेन
आणि तुमच्या नावाचे सदासर्वदा गुणगान करेन.
3याहवेह महान आहेत व परमस्तुत्य आहेत;
त्यांची थोरवी अगाध आहे.
4तुमच्या अद्भुतकृत्यांची महती एक पिढी दुसर्या पिढीस विदित करते;
ते तुमच्या महत्कार्याची उद्घोषणा करतात.
5ते तुमच्या गौरवी प्रभुसत्तेची महती सांगतात—
आणि मी तुमच्या अद्भुत कार्यांचे मनन करेन.
6ते तुमच्या भयावह चमत्कारांची प्रशंसा करतील—
मी तुमच्या थोरवीची घोषणा करेन.
7ते तुमचा विपुल चांगुलपणा साजरा करतील,
आणि आनंदाने तुमच्या नीतिमत्वाचे गुणगान गातील.
8याहवेह करुणामय व कृपावान आहेत,
ते मंदक्रोध व प्रीतीने ओतप्रोत भरलेले आहेत.
9याहवेह सर्वांशी भलेपणाने वागतात;
त्यांची करुणा त्यांच्या सर्व निर्मितीवर स्थिर असते.
10याहवेह तुमची निर्मिती तुमची उपकारस्तुती करेल,
आणि तुमचे संतजन तुम्हाला धन्य म्हणतील.
11ते तुमच्या साम्राज्याच्या भव्यतेचे वर्णन
आणि तुमच्या सामर्थ्याची उद्घोषणा करतील.
12जेणेकरून तुम्ही केलेली अद्भुत कृत्ये
आणि तुमच्या अप्रतिम राजवैभवाबद्दल सर्व मानवजातीस ज्ञान होईल.
13कारण तुमचे राज्य अनंतकाळचे राज्य आहे,
तुमची सत्ता पिढ्यान् पिढ्या चालते.
याहवेह आपल्या सर्व प्रतिज्ञांशी एकनिष्ठ आहेत,
त्यांच्या सर्व कार्यात ते विश्वासू असतात.
14याहवेह सर्व पतन पावलेल्यांस उचलून घेतात
व ओझ्याखाली वाकलेल्यास आधार देऊन उभे करतात.
15सर्वांची दृष्टी तुमच्याकडे लागलेली असते
आणि प्रत्येकास योग्य वेळेवर तुम्ही अन्य पुरवठा करता.
16तुम्ही आपला हात उघडता
आणि प्रत्येक जीवित प्राण्यांची सर्व इच्छा पूर्ण करता.
17याहवेहचे प्रत्येक मार्ग न्यायीपणाचे आहे
आणि ते आपल्या सर्व कृत्यात विश्वासू आहेत.
18जे त्यांचा धावा करतात,
जे खरोखर मनापासून त्यांचा धावा करतात, त्यासर्वांच्या समीप याहवेह असतात.
19त्यांचे भय बाळगणार्यांच्या सर्व इच्छा ते पूर्ण करतात;
त्यांचा धावा ते ऐकतात आणि त्यांना संकटमुक्त करतात:
20जे त्यांच्यावर प्रीती करतात, याहवेह त्या सर्वांचे रक्षण करतात,
परंतु ते सर्व दुष्टांचा नायनाट करतील.
21माझे मुख याहवेहची उपकारस्तुती करेल.
प्रत्येक प्राणिमात्र त्यांच्या पवित्र नावाचे
युगानुयुग गौरव करोत.
सध्या निवडलेले:
स्तोत्रसंहिता 145: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.