स्तोत्रसंहिता 25
25
स्तोत्र 25
दावीदाचे स्तोत्र.
1याहवेह, माझ्या परमेश्वरा,
मी तुमच्यावर भरवसा ठेवतो.
2माझ्या परमेश्वरा मी तुमच्यावर भरवसा ठेवतो.
मला लज्जित होऊ देऊ नका,
माझ्या शत्रूंना मजवर विजयी होऊ देऊ नका.
3जो कोणी तुमच्यावर आशा धरतो,
तो कधीही लज्जित होणार नाही.
पण जे विनाकारण उपद्रव देतात,
ते सर्वजण लज्जित होतील.
4याहवेह, मला तुमचे मार्ग दाखवा,
तुमचे मार्ग मला शिकवा.
5मला तुमच्या सत्यामध्ये चालवा आणि शिक्षण द्या;
कारण मला तारणारे परमेश्वर तुम्हीच आहात,
आणि दिवसभर माझी आशा तुम्हामध्ये आहे.
6याहवेह, तुम्ही आपली महान कृपा व प्रीती स्मरण करा,
ती सनातन काळापासून आहेत.
7माझी तारुण्यातील पातके
आणि बंडखोर वृत्ती आठवू नका;
तुमच्या प्रीतीनुसार माझे स्मरण करा,
कारण याहवेह, तुम्ही चांगले आहात.
8याहवेह चांगले आणि न्यायी आहेत;
म्हणून ते पापी जनांस आपल्या मार्गांचे शिक्षण देतात.
9ते नम्रजनांस नीतिमत्वाच्या मार्गावर नेतात,
आणि त्यांना आपल्या मार्गाचे शिक्षण देतात.
10जे याहवेहचे करार आणि नियमशास्त्र पाळतात,
त्यांच्यासाठी त्यांचे सर्व मार्ग प्रीतीचे आणि विश्वासयोग्य आहेत.
11याहवेह, आपल्या नावाच्या गौरवासाठी
माझे अपराध क्षमा करा, कारण ते घोर आहेत.
12याहवेहला भिऊन वागणारा मनुष्य कोण आहे?
याहवेह, त्याने ज्या मार्गाने जावे, त्या मार्गाचे शिक्षण त्याला देतील.
13ते समृद्धीत आपले दिवस व्यतीत करतील
आणि त्यांची संतती पृथ्वीचे वतन पावतील.
14याहवेहचे भय धरणार्यांवर ते आपली रहस्ये प्रगट करतात;
त्यांनाच ते आपला करार जाहीर करतात.
15माझे नेत्र याहवेहकडे लागलेले आहेत,
कारण तेच माझे पाय जाळ्यातून सोडवतील.
16याहवेह, माझ्याकडे वळून मजवर दया करा,
कारण मी एकटा आणि पीडित आहे.
17माझ्या अंतःकरणातील यातना दूर करा
आणि माझ्या तीव्र मनोवेदनेतून मला मुक्त करा.
18माझे क्लेश आणि माझ्या वेदना पाहा
आणि माझ्या सर्व पातकांची क्षमा करा.
19पाहा, मला अनेक शत्रू आहेत
आणि किती तीव्रपणे ते माझा द्वेष करतात.
20माझ्या जिवाचे रक्षण करा आणि मला वाचवा;
मला लज्जित होऊ देऊ नका,
कारण मी तुमच्या आश्रयास आलो आहे.
21सात्विकपणा व सरळपणा माझे रक्षण करो,
कारण याहवेह, माझा भरवसा तुमच्यावर आहे.
22परमेश्वरा, इस्राएली राष्ट्राची,
त्यांच्या सर्व त्रासातून मुक्तता करा!
सध्या निवडलेले:
स्तोत्रसंहिता 25: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.