लूक 11
11
प्रार्थनेसंबंधी येशूंचे शिक्षण
1एके दिवशी येशू एका ठिकाणी प्रार्थना करीत होते. प्रार्थना संपल्यावर त्यांच्या शिष्यांपैकी एकाने त्यांना म्हटले, “प्रभूजी, योहानाने जशी त्याच्या शिष्यांना प्रार्थना करावयास शिकविले, त्याप्रमाणे तुम्हीही आम्हास शिकवा.”
2येशूंनी शिष्यांना सांगितले, “अशा रीतीने प्रार्थना करा:
“ ‘हे पित्या,#11:2 काही मूळ प्रतींमध्ये आमच्या स्वर्गातील पित्या
तुमचे नाव पवित्र मानिले जावो;
तुमचे राज्य येवो.#11:2 काही मूळ प्रतींमध्ये जसे पृथ्वीवर तसे स्वर्गात तुमच्या इच्छेप्रमाणे होवो
3आमची रोजची भाकर प्रतिदिनी आम्हाला द्या.
4कारण जशी आम्ही आमच्या अपराध्यांस क्षमा करतो;
तशी तुम्ही आमच्या पापांची क्षमा करा#11:4 किंवा जे आमचे ऋणी आहोत
आम्हास परीक्षेत आणू नका.’ ”#11:4 काही मूळ प्रतींमध्ये, पण आम्हाला त्या दुष्टापासून सोडवा
5येशू त्यांना म्हणाले, “समजा तुमचा एक मित्र आहे, मध्यरात्री तुम्ही त्याच्याकडे जाऊन म्हणता, ‘मित्रा, मला तीन भाकरी उसन्या दे; 6माझा मित्र प्रवास करून घरी आला आहे, पण त्याला वाढण्यासाठी माझ्याजवळ काहीच नाही.’ 7समजा तुमचा मित्र आतून उत्तर देईल, ‘मला त्रास देऊ नको. दार बंद झाले आहे आणि मी व माझी मुले अंथरुणात आहोत आणि आता मी उठून तुला काही देऊ शकत नाही.’ 8परंतु मी तुम्हाला सांगतो की, जरी मैत्रीमुळे तो उठून त्याला भाकर देणार नाही, तरी तुमच्या आग्रहामुळे#11:8 किंवा त्याच्या चांगल्या नावासाठी तो नक्कीच उठेल आणि जितकी तुमची गरज आहे तितके तो तुम्हाला देईल.
9“मी तुम्हाला सांगतो, मागा म्हणजे तुम्हाला मिळेल, शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल, दार ठोका म्हणजे ते उघडले जाईल. 10कारण जो कोणी मागतो त्याला मिळेल, जो कोणी शोधतो त्याला सापडेल आणि जो कोणी ठोकतो, त्याच्यासाठी दार उघडले जाईल.
11“तुमच्यातील कोण असे वडील आहेत, जर तुमच्या मुलाने तुमच्याजवळ#11:11 काही मूळ प्रतींमध्ये, भाकर मागितली असता धोंडा देईल का? मासा मागितला, तर तुम्ही त्याला साप द्याल? 12किंवा जर त्याने अंडे मागितले, तर त्याला विंचू द्याल? 13तर तुम्ही दुष्ट असताना तुमच्या लेकरांना चांगल्या देणग्या देण्याचे तुम्हाला समजते, तर मग स्वर्गीय पित्याजवळ जे मागतात, त्यांना ते कितीतरी विपुलतेने पवित्र आत्मा देणार!”
येशू आणि बालजबूल
14येशू एका मुक्या दुरात्म्याला काढत होते, तो दुरात्मा निघून गेल्यानंतर, त्या मुक्या मनुष्याला बोलता येऊ लागले. ते पाहून गर्दीतील लोक आश्चर्यचकित झाले. 15पण काहीजण म्हणाले, “हा बालजबूल, भुतांचा राजा सैतानाच्या साहाय्याने भुतांना घालवित असतो.” 16दुसर्यांनी परीक्षा पाहण्याकरिता आकाशातून चिन्ह दाखवा अशी मागणी केली.
17त्यांचे विचार येशूंना माहीत होते आणि ते त्यांना म्हणाले, “ज्या राज्यात फूट पडलेली आहे, त्या राज्याचा नाश होतो आणि आपसात फूट पडलेले घर कोसळून पडते. 18जर सैतानातच फूट पडली, तर त्याचे राज्य कसे टिकेल?” कारण तुम्ही असा दावा करता की मी बालजबूलच्या साहाय्याने भुते काढतो, 19आता मी जर बालजबूलच्या साहाय्याने भुते काढतो, तर तुमचे अनुयायी कोणाच्या साहाय्याने भुते काढतात? मग तेच तुमचे न्यायाधीश असतील. 20परंतु मी जर परमेश्वराच्या शक्तीने भुते काढतो, तर परमेश्वराचे राज्य तुमच्यावर आले आहे.
21“जोपर्यंत एखादा बळकट मनुष्य, पूर्ण सशस्त्र होऊन आपल्या घराची रखवाली करतो, तोपर्यंत त्याची मालमत्ता सुरक्षित राहते. 22पण एखादा अधिक बलवान येऊन त्याला जिंकतो व ज्या शस्त्रांवर त्याचा भरवसा होता ते काढून त्याची सर्व मालमत्ता लुटतो व वाटून देतो.
23“जो माझ्याबरोबर नाही तो माझ्याविरुद्ध आहे आणि जो माझ्याबरोबर गोळा करीत नाही तो विखुरतो.
24“एखाद्या मनुष्यातून अशुद्ध आत्मा निघाला म्हणजे तो रुक्ष ठिकाणी विश्रांती घेण्यासाठी जागा शोधतो आणि ती त्याला सापडत नाही. त्यावेळी तो म्हणतो, ‘जे घर मी सोडले, तिथे परत जाईन.’ 25तो परत आला म्हणजे त्याला ते घर झाडून स्वच्छ केलेले व व्यवस्थित ठेवलेले असे आढळते. 26नंतर तो जाऊन आपल्यापेक्षा अधिक दुष्ट असे आणखी सात दुरात्मे घेऊन येतो व ते आत जाऊन तिथे राहतात आणि मग त्या मनुष्याची अवस्था पहिल्यापेक्षा वाईट होते.”
27येशू बोलत असताना त्या गर्दीतील एक स्त्री ओरडून म्हणाली, “धन्य तुझी माता, जिने तुला जन्म दिला, दूध पाजले व तुझे पोषण केले!”
28त्याने उत्तर दिले, “परंतु जे परमेश्वराचे वचन ऐकतात आणि त्याप्रमाणे आचरण करतात, ते अधिक धन्य आहेत.”
योनाहचे चिन्ह
29आपल्या भोवती लोकांची खूपच गर्दी वाढली हे पाहून येशू म्हणाले, “ही दुष्ट पिढी चिन्ह मागते पण योनाहच्या चिन्हाखेरीज दुसरे चिन्ह या पिढीला दिले जाणार नाही. 30कारण ज्याप्रमाणे योनाह निनवेहच्या लोकांना चिन्ह होता, तसेच मानवपुत्र या पिढीला चिन्ह असा होईल. 31दक्षिणेची राणी न्यायकाळी या पिढीच्या लोकांबरोबर उठेल आणि त्यांना दंडपात्र ठरवेल, कारण ती शलोमोनाचे ज्ञान ऐकण्यास पृथ्वीच्या टोकाकडून आली; आणि आता तर शलोमोनापेक्षा थोर असा कोणी येथे आहे. 32न्यायाच्या दिवशी निनवेहचे लोक उठून या पिढीला दोषी ठरवतील, कारण योनाहचा उपदेश ऐकून त्यांनी पश्चात्ताप केला आणि योनाहपेक्षाही श्रेष्ठ असा एकजण येथे आहे.
शरीराचा दिवा
33“कोणी दिवा लावून त्याचा प्रकाश लपून राहील अशा ठिकाणी किंवा मापाखाली ठेवत नाही. उलट दिवठणीवर ठेवतात, यासाठी की आत येणार्यांनाही प्रकाश मिळावा. 34तुझा डोळा शरीराचा दिवा आहे. तुझे डोळे निर्दोष#11:34 किंवा इथे याचा अर्थ उदार असले म्हणजे तुझे सर्व शरीरही प्रकाशमय होईल. पण जर ते दोषी#11:34 किंवा इथे याचा अर्थ कंजूष असतील तर तुझे शरीरही अंधकारमय असेल. 35म्हणून तुझ्यामध्ये जो प्रकाश आहे, तो अंधार तर नाही ना, याविषयी काळजी घे. 36यास्तव, जर तुझे सर्व शरीर प्रकाशाने भरलेले असले आणि कोणताही भाग अंधकारमय नसला, तर दिव्याचा प्रकाश तुझ्यावर पडेल तसे ते पूर्णपणे प्रकाशमय होईल.”
परूशी व नियमशास्त्र शिक्षक यांना शाप
37येशूंनी आपले बोलणे संपविले, त्यावेळी एका परूश्याने त्यांना भोजनास यावे अशी विनंती केली; त्याप्रमाणे ते गेले व मेजाभोवती बसले. 38परंतु जेव्हा त्याने पाहिले की येशूंनी जेवणासाठी प्रथम हात धुतले नाहीत तेव्हा त्या परूश्याला आश्चर्य वाटले.
39ते पाहून प्रभू त्याला म्हणाले, “तुम्ही परूशी लोक थाळी व प्याला बाहेरून स्वच्छ करता, पण तुमची मने लोभ आणि दुष्टपणा यांनी भरलेली असतात. 40अहो मूर्ख लोकांनो! ज्याने बाहेरील भाग घडविला त्यानेच अंतर्भाग सुद्धा घडविला नाही काय? 41तुमच्या अंतर्भागाबद्धल बोलायचे तर गरिबांना उदारता दाखवा म्हणजे तुम्हाला सर्वकाही शुद्ध असल्याचे आढळेल.
42“तुम्हा परूश्यांना धिक्कार असो! तुम्ही पुदिना, शेपू व बागेतील प्रत्येक प्रकारची भाजी यांचा दशांश देत असला, तरी तुम्ही न्याय आणि परमेश्वराची प्रीती याकडे दुर्लक्ष करता. तुम्ही दशांश निश्चितच द्यावा, पण ज्या अधिक महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या तुम्ही सोडू नयेत.
43“अहो परूश्यांनो, तुम्हाला धिक्कार असो! कारण भरबाजारात लोकांकडून मुजरे घेणे व सभागृहामध्ये प्रमुख जागेवर बसणे हे तुम्हाला प्रिय आहे.
44“तुमचा धिक्कार असो! कारण तुम्ही खुणा नसलेल्या कबरांसारखे आहात,#11:44 यहूदी लोकांच्या मताप्रमाणे कबरेवरून चालणारे लोक अशुद्ध होतात, तसेच त्यांच्या संपर्कात येणारे सुद्धा अशुद्ध होतात. लोकांना त्यावरून चालताना त्यांना माहीत होत नाही.”
45त्यावेळी तिथे असलेला एक नियमशास्त्रज्ञ म्हणाला, “गुरुजी, तुम्ही आता जे बोलला, त्यामुळे तुम्ही आमचा सुद्धा अपमान करीत आहात.”
46येशूंनी उत्तर दिले, “आणि तुम्ही जे नियमशास्त्रतज्ञ आहात, त्या तुम्हाला धिक्कार असो, कारण तुम्ही लोकांच्या खांद्यावर अशी अवघड ओझी लादता, जी ते वाहू शकत नाहीत, परंतु त्यांना मदत करण्यासाठी स्वतःचे एकही बोट लावण्याची तुमची इच्छा नसते.
47“तुम्हाला धिक्कार असो! कारण तुम्ही संदेष्ट्यांच्या कबरा बांधता ज्यांना तुमच्या पूर्वजांनी मारून टाकले. 48म्हणून तुमच्या पूर्वजांनी जे काही केले ते योग्यच होते अशी तुम्ही साक्ष देत आहात; त्यांनी संदेष्ट्यांचा वध केला आणि तुम्ही त्यांच्या कबरा बांधता. 49याकारणास्तव परमेश्वर त्यांच्या ज्ञानाप्रमाणे म्हणतात, ‘मी तुमच्याकडे संदेष्टे व प्रेषित पाठवेन आणि त्यांच्यापैकी काहींचा तुम्ही वध कराल आणि इतरांचा छळ कराल.’ 50म्हणून जगाच्या प्रारंभापासून सर्व संदेष्ट्यांचे जे रक्त सांडण्यात आले, त्याबद्दल या पिढीला जबाबदार धरले जाईल. 51हाबेलाच्या रक्तापासून तर जखर्याहच्या रक्तापर्यंत जो मंदिर आणि वेदी यांच्यामध्ये वधला गेला होता. त्याबद्दल या पिढीला जबाबदार धरले जाईल हे मी तुम्हाला सांगतो.
52“तुम्हा नियमशास्त्र तज्ञांना धिक्कार असो, कारण तुम्ही ज्ञानाची किल्ली काढून घेतली. तुम्ही स्वतः प्रवेश करत नाही व जे प्रवेश करू पाहतात त्यांनाही अडखळण करता.”
53येशू बाहेर गेल्यानंतर, परूशी आणि नियमशास्त्राच्या शिक्षकांनी त्यांना उग्रपणाने विरोध करण्यास सुरुवात केली आणि त्यांना घेराव घालून त्यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला. 54त्यांना शब्दात धरण्याची ते संधी शोधू लागले.
Selectat acum:
लूक 11: MRCV
Evidențiere
Partajează
Copiază
Dorești să ai evidențierile salvate pe toate dispozitivele? Înscrie-te sau conectează-te
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.