YouVersion
Pictograma căutare

लूक 12

12
इशारे आणि उत्तेजन
1त्या दरम्यान हजारोंच्या संख्येने लोक एकत्र झाले त्यामुळे ते एकमेकास चेंगरू लागले. तेव्हा येशू प्रथम आपल्या शिष्यांना म्हणाले, “या परूशी लोकांच्या खमिरापासून म्हणजे ढोंगीपणापासून सांभाळा. 2जे प्रकट होणार नाही असे काही झाकलेले नाही किंवा जे गुप्त आहे ते उघडकीस येणार नाही. 3जे तुम्ही अंधारात सांगितले आहे, ते दिवसाच्या प्रकाशात ऐकले जाईल; जे तुम्ही आतील खोलीत कानात सांगितले, ते घराच्या धाब्यावरून जाहीर केले जाईल.
4“माझ्या मित्रांनो, जे शरीराचा नाश करतात व त्यानंतर काही करण्यास समर्थ नाहीत अशांना भिऊ नका. 5कोणाचे भय बाळगावे, हे मी तुम्हाला सांगतो: शरीराचा वध केल्यानंतर, नरकात टाकण्याचा ज्याला अधिकार आहे, त्याची भीती बाळगा. होय, मी सांगतो त्याचीच भीती बाळगा. 6पाच चिमण्या दोन पैशात विकत नाहीत काय? तरी त्यापैकी एकही चिमणीचा परमेश्वराला विसर पडत नाही. 7खरोखर, तुमच्या डोक्याचे सर्व केसही मोजलेले आहेत. म्हणून भीती बाळगू नका; कारण तुम्ही पुष्कळ चिमण्यांपेक्षा अधिक मोलवान आहात.
8“मी तुम्हाला सांगतो, की जर कोणी मला इतरांपुढे जाहीरपणे स्वीकारेल, तर मानवपुत्र सुद्धा देवदूतांसमक्ष जाहीरपणे तुमचा स्वीकार करेन. 9तरी जे मला लोकांसमोर नाकारतात, त्यांना मी परमेश्वराच्या दूतांसमक्ष नाकारीन. 10आणि प्रत्येकजण जो मानवपुत्राच्या विरुद्ध बोलेल त्याला क्षमा होईल, परंतु जे कोणी पवित्र आत्म्याविरुद्ध दुर्भाषण करतात त्यांना कधीही क्षमा केली जाणार नाही.
11“ज्यावेळी तुम्हाला सभागृह, पुढारी, राज्यकर्ते यांच्यापुढे आणण्यात येईल, तेव्हा तुम्ही स्वतःचा बचाव कसा करावा व काय बोलावे याविषयी चिंता करू नका. 12कारण तुम्ही तिथे उभे असताना, काय बोलावे हे पवित्र आत्मा तुम्हाला शिकवेल.”
श्रीमंत लोभीचा दाखला
13तेवढ्यात समुदायामधून एकजण म्हणाला, “गुरुजी, माझ्या भावाला मजबरोबर वतनाची विभागणी करण्यास सांगा.”
14परंतु येशूंनी त्याला उत्तर दिले, “मला न्यायनिवाडा करण्यासाठी कोणी तुम्हावर न्यायाधीश नेमले?” 15नंतर येशू त्यांना म्हणाले, “सावध राहा, सर्वप्रकारच्या लोभापासून दूर राहा, कारण पुष्कळ धनसंपत्ती मध्ये जीवन नसते.”
16नंतर येशूंनी एक दाखला सांगितला: “एका श्रीमंत माणसाच्या शेतामध्ये भरपूर पीक आले. 17तो मनाशी विचार करू लागला, ‘मी काय करू? माझ्याजवळ धान्य ठेवावयास जागा नाही.’
18“तो म्हणाला, ‘मी असे करतो. मी माझी सगळी कोठारे पाडून टाकेन आणि यापेक्षाही मोठी बांधेन, म्हणजे मला धान्य साठविता येईल. 19आणि मी स्वतःस म्हणेन, “पुढे अनेक वर्षे पुरेल एवढ्या धान्यांचा तुझ्याकडे साठा आहे. आता विसावा घे; खा, पी आणि आनंद कर.” ’
20“पण परमेश्वर त्याला म्हणाले, ‘अरे मूर्खा! आज रात्रीच जर तुझा जीव मागितला गेला तर; जे सर्व तू स्वतःसाठी तयार केले आहे ते कोणाचे होईल?’
21“परमेश्वराच्या मोलवान आशीर्वादांची संपत्ती मिळविण्याऐवजी, जो मनुष्य स्वतःसाठी द्रव्याचा नुसता संचय करतो, त्याचीही अशीच गत होणार आहे.”
काळजी करू नका
22तेव्हा येशू त्यांच्या शिष्यांना म्हणाले: “मी तुम्हाला सांगतो, तुम्ही काय खावे अशी तुमच्या जिवाबद्दल किंवा तुम्ही काय पांघरावे अशी तुमच्या शरीराबद्दल चिंता करू नका. 23अन्नापेक्षा जीव आणि वस्त्रांपेक्षा शरीर अधिक महत्त्वाचे नाही काय? 24कावळ्यांचा विचार करा; ते धान्य पेरीत नाही, कापणी करीत नाही, त्यांच्याकडे कोठार वा भांडार नसते, तरीही परमेश्वर त्यांना खायला घालतात आणि तुम्ही तर पक्ष्यांपेक्षा कितीतरी अधिक मोलवान आहात! 25शिवाय काळजी करून आयुष्यातील एक तास तरी कोणास वाढविता येईल काय?#12:25 किंवा आपली उंची हातभर वाढवता येईल काय 26तुम्ही साध्या गोष्टी देखील करू शकत नाही तर इतर गोष्टीबद्दल काळजी का करता?
27“रानातील फुले कशी वाढतात याचा विचार करा. ती कष्ट करीत नाहीत किंवा कातीत नाहीत. तरी मी तुम्हाला सांगतो की शलोमोनदेखील आपल्या सर्व वैभवात त्यांच्याइतका नटला नव्हता. 28जे आज आहे आणि उद्या अग्नीत टाकले जाते, त्या गवताला जर परमेश्वर असा पोशाख घालतात, तर अहो अल्पविश्वासी, ते तुम्हाला किती विशेषकरून पोशाख घालतील! 29तसेच, काय खावे, काय प्यावे याविषयी आपल्या मनात मुळीच काळजी करू नका. 30कारण परकीय लोक या गोष्टींच्या मागे लागतात, पण तुम्हाला या गोष्टींची गरज आहे, हे तुमच्या पित्याला माहीत आहे. 31परंतु तुम्ही त्यांचे राज्य मिळविण्यासाठी झटा म्हणजे या सर्व गोष्टीही तुम्हाला प्राप्त होतील.
32“हे लहान कळपा, तू भिऊ नकोस कारण तुम्हाला राज्य देण्यास पित्याला आनंद होतो. 33तुमची मालमत्ता विका आणि गरिबांना द्या. कधीही जीर्ण होणार नाही अशा पिशव्या स्वतःसाठी घ्या, वर स्वर्गामध्ये नष्ट न होणारा खजिना ठेवा, जिथे कोणी चोर येणार नाही की त्याला कसरही लागणार नाही. 34कारण जिथे तुमची संपत्ती आहे, तिथे तुमचे मनही असेल.
जागृतीची आवश्यकता
35“तुम्ही सेवेसाठी सज्ज व्हा व आपले दिवे जळत राहू द्या, 36अशा सेवकांसारखे असावे की, जे त्यांचा धनी लग्नाच्या मेजवानीवरून परत येईल म्हणून वाट पाहत आहेत, यासाठी की जेव्हा तो येतो आणि दार ठोठावतो त्याक्षणीच त्याच्यासाठी दार उघडावे. 37त्या सेवकांसाठी हे फारच चांगले असेल की, त्यांचा धनी येतो, तेव्हा ते जागे आहेत असे त्याला दिसून येते. मी तुम्हाला निश्चित सांगतो, तो धनी स्वतः त्यांची सेवा करण्यासाठी वस्त्रे घालेल आणि त्यांना मेजाभोवती मागे टेकून बसावयास सांगेल आणि तो येईल आणि त्यांना जेवण वाढेल. 38तो मध्यरात्री येवो किंवा पहाटे, पण एवढे मात्र निश्चित की तो केव्हाही आला, तरी त्याची वाट पाहत तयारीत असणार्‍या सेवकांना फार मोठा आशीर्वाद प्राप्त होईल. 39पण एक गोष्ट नीट समजून घ्या की चोर केव्हा येणार ती घटका घरधन्याला आधी समजली असती, तर तो जागा राहिला असता आणि आपले घर फोडू दिले नसते. 40तुम्ही सदैव तयारीत राहा. कारण मानवपुत्र तुम्हाला कल्पना नसेल अशा घटकेला येईल.”
41पेत्राने विचारले, “प्रभूजी, तुम्ही हा दाखला आम्हाला उद्देशून सांगत आहात की सर्वांना?”
42यावर प्रभूजींनी उत्तर दिले, “प्रामाणिक व सुज्ञ कारभारी कोण आहे, ज्याच्यावर घरधनी त्याच्या सेवकांच्या अन्नाचे योग्य वेळी वाटप करण्याचे काम सोपवितो? 43धनी येईल, तेव्हा जो दास आपली कामगिरी बजावीत असताना त्याला आढळेल, तो धन्य होय. 44मी तुम्हाला निश्चित सांगतो की तो धनी आपल्या सर्व मालमत्तेवर त्याची नेमणूक करेल. 45परंतु जो सेवक आपल्या मनात म्हणेल, ‘माझा धनी येण्यास पुष्कळ विलंब होत आहे,’ आणि तो सोबतीच्या दासांना व दासींना मारहाण करू लागेल आणि पिणार्‍यांबरोबर खाऊ आणि पिऊ लागेल. 46तर त्या दासाचा धनी, तो अपेक्षा करीत नाही आणि तो सावध नाही अशा घटकेला येईल. तो त्या दासाचे तुकडे करेल व अविश्वासणार्‍यांबरोबर त्याला वाटा देईल.
47“मग त्या सेवकाला पुष्कळ फटके मारण्यात येतील, कारण धन्याची इच्छा माहीत असूनही त्याने तयारी केली नाही किंवा धन्याला जे पाहिजे ते केले नाही. 48परंतु ज्यांना माहीत नाही की त्यांनी शिक्षेस पात्र अशी कृत्ये केली आहेत त्यांना थोडेच फटके मारण्यात येतील. ज्या प्रत्येकाला भरपूर दिलेले आहे, त्याच्याकडून भरपूर मागणी केली जाईल आणि ज्याच्याकडे अधिक सोपविलेले आहे, त्याच्याकडून खूप अधिक मागण्यात येईल.
शांती नव्हे पण फूट
49“मी पृथ्वीवर आग आणली आहे, ती आधी पेटली असती तर किती बरे झाले असते, 50मला एक बाप्तिस्मा घ्यावयाचा आहे. त्याची पूर्णता होईपर्यंत माझ्यावर कितीतरी दडपण आहे! 51मी पृथ्वीवर शांती देण्यासाठी आलो आहे, असे तुम्हाला वाटते का? नाही, मी तर फूट पाडण्यासाठी आलो आहे. 52येथून पुढे एका कुटुंबात असलेल्या पाचजणांत एकमेकांविरुद्ध फूट पडेल, तिघांविरूद्ध दोघे आणि दोघांविरुद्ध तिघे असे होतील. 53ते विभागले जातील त्यांच्यामध्ये फूट पडेल, बापाविरुद्ध पुत्र आणि पुत्राविरुद्ध पिता, मुलगी आईविरुद्ध आणि आई मुलीविरुद्ध, सासू सुनेविरुद्ध आणि सून सासूविरुद्ध.”
काळाचा अर्थ लावणे
54ते लोकांना म्हणाले: “पश्चिमेकडे ढग जमलेले तुम्हाला दिसले, म्हणजे तुम्ही लगेच म्हणता, ‘आता पाऊस पडेल,’ आणि तो पडतो. 55आणि जेव्हा दक्षिणेकडील वारा वाहू लागतो, तेव्हा तुम्ही म्हणता, ‘आज उकडेल’ आणि तसे होते. 56ढोंगी जनहो! पृथ्वीवरील व आकाशात होणार्‍या बदलांचे अर्थ तुम्हाला कळतात, परंतु आताच्या काळाच्या चिन्हांचा अर्थ तुम्हाला का लावता येत नाही?
57“जे काही योग्य आहे, त्याविषयी तुम्हीच स्वतःसाठी न्याय का करीत नाही? 58ज्यावेळी तुम्ही शत्रूबरोबर न्यायालयात जाण्यापूर्वी वाटेत एकत्रित असतानाच संबंध नीट करा, नाहीतर तुमचा शत्रू तुम्हाला न्यायाधीशाकडे ओढून नेईल, न्यायाधीश अधिकार्‍याच्या हाती सोपवून देईल आणि अधिकारी तुम्हाला तुरुंगात टाकेल. 59मी तुम्हाला सांगतो की प्रत्येक दमडी चुकती केल्याशिवाय तुमची तुरुंगातून सुटका होणार नाही.”

Selectat acum:

लूक 12: MRCV

Evidențiere

Partajează

Copiază

None

Dorești să ai evidențierile salvate pe toate dispozitivele? Înscrie-te sau conectează-te