लूक 22
22
यहुदाने केलेला विश्वासघात
1त्या वेळी बेखमीर भाकरीचा सण, ज्याला ओलांडण सण म्हणतात, तो जवळ आला होता. 2मुख्य याजक व शास्त्री हे येशूचा घात कसा करावा, ह्याविषयी विचार करीत होते कारण त्यांना लोकांची भीती वाटत होती.
3त्यानंतर बारा प्रेषितांपैकी ज्याला इस्कर्योतदेखील म्हणत, त्या यहुदामध्ये सैतान शिरला. 4तो मुख्य याजक व मंदिराच्या रक्षकांचे अधिकारी ह्यांच्याकडे निघून गेला आणि त्यांच्या हाती येशूला कसे धरून द्यावे, ह्याविषयी त्याने त्यांच्याशी मसलत केली 5ते खूश होऊन त्यांनी त्याला पैसे देण्याचे कबूल केले. 6त्याने होकार दिला आणि लोकांना कळणार नाही अशा वेळी त्यांच्या हाती येशूला धरून देण्याची तो संधी शोधू लागला.
शेवटच्या भोजनाची तयारी
7ज्या दिवशी ओलांडण सणाचा यज्ञपशू मारायचा, तो बेखमीर भाकरीचा दिवस आला. 8येशूने पेत्र व योहान ह्यांना असे सांगून पाठवले, “आपण ओलांडण सणाचे भोजन करावे म्हणून तुम्ही जाऊन आपल्यासाठी तयारी करा.”
9त्यांनी त्याला विचारले, “आम्ही त्याची तयारी कुठे करावी, अशी आपली इच्छा आहे?”
10त्याने त्यांना सांगितले, “तुम्ही नगरात प्रवेश केल्यावर पाण्याची घागर घेऊन जाणारा एक माणूस तुम्हांला भेटेल. तो ज्या घरात जाईल, त्या घरात त्याच्यामागून जा 11आणि त्या घराच्या धन्याला असे म्हणा, “गुरूजींनी तुम्हांला विचारले आहे की, मला माझ्या शिष्यांसह ओलांडण सणाचे भोजन करता येईल, अशी खोली कोठे आहे?’ 12तो तुम्हांला वरच्या मजल्यावर सज्ज केलेली प्रशस्त खोली दाखवील. तेथे तयारी करा.”
13ते गेले व त्याने सांगितल्याप्रमाणे त्यांना आढळले. तेथे त्यांनी ओलांडण सणाची तयारी केली.
शेवटचे भोजन
14ती वेळ आली तेव्हा येशू भोजनास बसला व त्याच्याबरोबर प्रेषितही बसले. 15तो त्यांना म्हणाला, “मी दुःख भोगण्यापूर्वी हे ओलांडण सणाचे भोजन तुमच्याबरोबर करावे, अशी माझी उत्कट इच्छा आहे. 16मी तुम्हांला सांगतो, देवाच्या राज्यात ह्या भोजनाची परिपूर्ती होईपर्यंत मी हे भोजन पुन्हा करणार नाही.”
17त्यानंतर प्याला घेऊन व देवाचे आभार मानून तो म्हणाला, “हा घ्या आणि तुमच्यांत वाटा. 18मी तुम्हांला सांगतो, देवाचे राज्य येईपर्यंत हा द्राक्षारस ह्यापुढे मी पिणार नाही.”
19मग त्याने भाकर घेऊन देवाचे आभार मानले व ती मोडली आणि ती त्यांना देऊन म्हटले, “हे माझे शरीर आहे. हे तुमच्यासाठी अर्पण केले आहे. माझ्या स्मरणार्थ हे करा.” 20त्याचप्रमाणे भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन म्हटले, “हा प्याला म्हणजे माझ्या रक्तात प्रस्थापित केलेला नवा करार आहे. हे रक्त तुमच्यासाठी ओतले आहे.
21पण पाहा, मला दगा देणारा माझ्याबरोबर आहे आणि त्याचा हात टेबलावर आहे. 22मनुष्याचा पुत्र अगोदरच ठरविण्यात आल्याप्रमाणे मृत्यू स्वीकारतो खरा परंतु जो त्याचा विश्वासघात करतो, त्याचा धिक्कार असो !”
23तेव्हा आपल्यापैकी जो असे करणार आहे, तो कोण असावा, ह्याचा ते आपसात विचार करू लागले.
सेवेत मोठेपणा
24आपल्यामध्ये सर्वांत मोठा कोण मानला जावा, ह्याविषयी शिष्यांमध्ये वाद झाला. 25त्याने त्यांना म्हटले, “परराष्ट्रीयांचे राजे त्यांच्या प्रजेवर प्रभुत्व चालवितात आणि अधिकारी लोकांना उपकारकर्ते म्हटले जाते. 26परंतु तुम्ही तसे नसावे, तर तुमच्यामध्ये जो सर्वांत मोठा, तो सर्वांत धाकट्यासारखा व नेतृत्व करणारा हा सेवा करणाऱ्यासारखा असावा. 27मोठा कोण? भोजनास बसणारा किंवा सेवा करणारा? अर्थात, भोजनास बसणारा. मी मात्र तुमच्यामध्ये सेवा करणारा असा आहे.
28माझ्या सत्त्वपरीक्षांमध्ये माझ्याबरोबर टिकून राहिलेले तुम्ही आहात. 29माझ्या पित्याने जसा मला राजाधिकार दिला आहे, तसा मीही तुम्हांला देईन. 30तुम्ही माझ्या राज्यात माझ्या टेबलावर खाल व प्याल आणि राजासनांवर बसून इस्राएलच्या बारा वंशांचा न्याय कराल.”
पेत्र येशूला नाकारणार ह्याची पूर्वकल्पना
31प्रभू पुढे म्हणाला, “शिमोन, शिमोन, पाहा, तुम्हांला गव्हासारखे चाळावे म्हणून सैतानाने परवानगी मिळवली आहे. 32परंतु तुझा विश्वास ढळू नये म्हणून तुझ्यासाठी मी प्रार्थना केली आहे. तू माझ्याकडे वळलास म्हणजे तुझ्या भावांना स्थिर कर.”
33तो त्याला म्हणाला, “प्रभो, मी आपणाबरोबर तुरुंगात जाण्यास व मरण्यासही तयार आहे.”
34तो म्हणाला, “पेत्रा, मी तुला सांगतो, तू मला ओळखतोस, हे तीन वेळा तू नाकारशील, तोपर्यंत आज कोंबडा आरवणार नाही.”
35नंतर येशूने त्याच्या शिष्यांना विचारले, “मी तुम्हांला थैली, झोळी व वहाणा घेतल्याशिवाय पाठविले, तेव्हा तुम्हांला काही उणे पडले का?” ते म्हणाले, “नाही.”
36येशू म्हणाला, “पण आता तर ज्याच्याजवळ थैली आहे त्याने ती घ्यावी. तसेच झोळीही घ्यावी आणि ज्याच्याजवळ तलवार नाही त्याने आपला कोट विकून ती विकत घ्यावी. 37मी तुम्हांला सांगतो, तो गुन्हेगारांत गणलेला होता, असा जो धर्मशास्त्रलेख आहे, तो माझ्या बाबतीत पूर्ण झाला पाहिजे, कारण माझ्याविषयी लिहिलेल्या गोष्टी पूर्ण होत आहेत.”
38ते म्हणाले, “प्रभो, पाहा, येथे दोन तलवारी आहेत.” तो त्यांना म्हणाला, “पुरे.”
गेथशेमाने बागेत येशू
39तो बाहेर येऊन आपल्या परिपाठाप्रमाणे ऑलिव्ह डोंगराकडे गेला. त्याचे शिष्यही त्याच्या मागोमाग गेले. 40त्या ठिकाणी आल्यावर त्याने त्यांना म्हटले, “तुम्ही मोहात पडू नये म्हणून प्रार्थना करा.”
41मग सुमारे धोंड्याच्या टप्प्याइतका तो त्यांच्यापासून दूर गेला, तेथे त्याने गुडघे टेकून अशी प्रार्थना केली: 42‘हे पित्या, तुझी इच्छा असली, तर हा प्याला माझ्यापासून दूर कर. तरीही माझ्या इच्छेप्रमाणे नव्हे, तर तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे.” 43[तेव्हा स्वर्गातील एक देवदूत त्याच्या दृष्टीस पडला. त्याने येशूला शक्ती दिली. 44त्यानंतर अत्यंत विव्हळ होऊन येशूने अधिक कळकळीने प्रार्थना केली, तेव्हा रक्ताचे थेंब भूमीवर पडावेत तसा त्याचा घाम पडत होता.]
45प्रार्थना करून उठल्यावर तो शिष्यांजवळ आला, तेव्हा ते दुःखावेगाने झोपी गेलेले त्याला आढळले. 46तो त्यांना म्हणाला, “झोपलात का? तुम्ही मोहात पडू नये म्हणून उठून प्रार्थना करा.”
येशूला अटक
47येशू बोलत असतानाच लोकसमुदाय आला. यहुदा नावाचा बारामधला एक जण त्याचे नेतृत्व करीत होता. तो येशूचे चुंबन घ्यायला त्याच्याजवळ आला. 48येशू त्याला म्हणाला, “यहुदा, चुंबन घेऊन मनुष्याच्या पुत्राला धरून देतोस काय?”
49त्याच्या सभोवती जे होते, ते आता काय होणार, हे ओळखून त्याला म्हणाले, “प्रभो, आम्ही तलवारी चालवू काय?” 50त्यांच्यातील एकाने उच्च याजकांच्या दासावर प्रहार करून त्याचा उजवा कान छाटून टाकला.
51परंतु येशूने म्हटले, “नाही, असे नको.” त्याने त्या दासाच्या कानाला स्पर्श करून त्याला बरे केले.
52जे मुख्य याजक, मंदिराचे सरदार व वडीलजन त्याच्यावर चालून आले होते, त्यांना येशू म्हणाला, “जसे लुटारूवर जावे तसे तुम्ही तलवारी व सोटे घेऊन निघालात काय? 53मी दररोज मंदिरात तुमच्याबरोबर असे त्यावेळी तुम्ही माझ्यावर हात टाकला नाही. परंतु ही तुमची घटका आहे, राज्य अंधाराचे आहे.”
पेत्र येशूला नाकारतो
54त्यांनी येशूला पकडून उच्च याजकांच्या घरी नेले. पेत्र दुरून त्यांच्या मागोमाग चालू लागला. 55ते अंगणाच्या मध्यभागी विस्तव पेटवून एकत्र बसले होते, पेत्र त्यांच्यामध्ये जाऊन बसला. 56एका दासीने त्याला विस्तवाजवळ बसलेला पाहून त्याच्याकडे टक लावून म्हटले, “हादेखील येशूबरोबर होता.”
57पण ते नाकारून तो बोलला, “बाई, मी त्याला ओळखत नाही.”
58काही वेळाने दुसऱ्या एकाने त्याला पाहून म्हटले, “तूसुद्धा त्यांच्यातला आहेस.” पेत्र म्हणाला, “भल्या माणसा, मी त्यांच्यातला नाही.”
59सुमारे एक तास झाल्यावर आणखी एक जण ठामपणे म्हणू लागला, “खरोखर हादेखील येशूबरोबर होता कारण हासुद्धा गालीलकर आहे!”
60परंतु पेत्र म्हणाला, “गृहस्था, तू काय बोलतोस ते मला माहीत नाही.” असे तो बोलत आहे, इतक्यात कोंबडा आरवला. 61प्रभूने वळून पेत्राकडे दृष्टी लावली. आज कोंबडा आरवण्यापूर्वी तू तीन वेळा मला नाकारशील, असे जे प्रभूने पेत्राला सांगितले होते, ते त्याला आठवले. 62तो बाहेर जाऊन ओक्साबोक्शी रडला.
63ज्या लोकांच्या ताब्यात येशू होता, ते त्याची कुचेष्टा करत त्याला मारत होते. 64त्यांनी त्याचे डोळे बांधून त्याला विचारले, “अरे संदेष्ट्या, सांग, तुला कोणी मारले?” 65तसेच नाना प्रकारचे अपशब्द बोलून त्यांनी त्याची अवहेलना केली.
न्यायसभेपुढे येशू
66उजाडल्यावर लोकांचे वडीलजन, मुख्य याजक व शास्त्री एकत्र जमले. ते त्याला आपल्या न्यायसभेत नेऊन म्हणाले, 67“तू ख्रिस्त आहेस तर तसे आम्हांला सांग.” त्याने त्यांना म्हटले, “मी जर तुम्हांला तसे सांगितले, तर तुम्ही विश्वास ठेवणार नाही 68आणि मी विचारले तरी तुम्ही उत्तर देणार नाही. 69तथापि ह्यापुढे मनुष्याचा पुत्र सर्वसमर्थ देवाच्या उजवीकडे बसेल.”
70तेव्हा ते सर्व म्हणाले, “तर तू देवाचा पुत्र आहेस काय?” तो म्हणाला, “तुम्ही म्हणता, मी आहे.”
71तेव्हा ते म्हणाले, “आपल्याला आणखी साक्षीची काय गरज? आपण स्वतः त्याच्याच तोंडून ऐकले आहे.”
पिलातसमोर येशू
Zvasarudzwa nguva ino
लूक 22: MACLBSI
Sarudza vhesi
Pakurirana nevamwe
Sarudza zvinyorwa izvi
Unoda kuti zviratidziro zvako zvichengetedzwe pamidziyo yako yose? Nyoresa kana kuti pinda
Marathi C.L. (NT), पवित्र शास्त्र
Copyright © 2018 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.