लूक 22
22
यहूदा येशूंचा विश्वासघात करण्यास तयार होतो
1आता वल्हांडण सण#22:1 वल्हांडण सण इजिप्त देशातल्या 430 वर्षांच्या गुलामगिरीच्या बंधनातून बाहेर पडल्यानंतर साजरा केलेला सण, सात दिवसानंतर खमीर न घालता भाकरी खाण्याचा सण. हे दोन्ही सण एकत्रित पाळीत असत व त्यांची नावेही समानार्थाने वापरलेली आहेत. जवळ आला होता. यालाच बेखमीर भाकरीचा सण म्हणत असत. 2प्रमुख याजकवर्ग आणि नियमशास्त्र शिक्षक आता येशूंना कसे ठार करावे याचा विचार करू लागले. कारण ते लोकांना भीत होते. 3तेव्हा येशूंच्या बारा शिष्यांपैकी एक म्हणजे यहूदा इस्कर्योत याच्यात सैतानाने प्रवेश केला. 4तो प्रमुख याजकवर्ग आणि मंदिराचे सुरक्षा अधिकारी यांच्याकडे गेला आणि येशूंना विश्वासघाताने कसे धरून देता येईल, याविषयी त्याने त्यांच्याशी चर्चा केली. 5त्यांना आनंद झाला आणि त्यांनी त्याला मोबदला देण्याचे मान्य केले. 6या गोष्टीला त्याने मान्यता दिली आणि येशूंभोवती समुदाय नसताना त्यांना त्यांच्या हाती देण्याची योग्य संधी तो शोधू लागला.
शेवटले भोजन
7आता बेखमीर भाकरीच्या सणाचा दिवस आला, त्या दिवशी वल्हांडणाच्या कोकर्याचा बळी दिला जाणार होता. 8येशूंनी पेत्र आणि योहान यांना पुढे पाठविले व म्हणाले, “जा आणि आपल्यासाठी वल्हांडणाच्या भोजनाची तयारी करा.”
9तेव्हा त्या दोघांनी विचारले, “आम्ही कोठे तयारी करावी?”
10येशूंनी उत्तर दिले, “तुम्ही शहरात जा आणि एक मनुष्य पाण्याने भरलेली मोठी घागर घेऊन जात असलेला तुम्हाला भेटेल. ज्या घरात तो जाईल तेथे त्याच्यामागे जा. 11त्या घराच्या मालकाला सांगा, ‘गुरुजी विचारत आहेत की, ज्या ठिकाणी मला माझ्या शिष्यांबरोबर वल्हांडणाचे भोजन करता येईल ती पाहुण्यांची खोली कुठे आहे?’ 12तेव्हा तो तुम्हाला माडीवरील सजविलेल्या मोठ्या खोलीत घेऊन जाईल. तेथेच तयारी करा.”
13ते गेले आणि येशूंनी सांगितल्याप्रमाणे गोष्टी आढळल्या. तेव्हा त्यांनी तेथे वल्हांडणाच्या भोजनाची तयारी केली.
14जेव्हा ती वेळ आली तेव्हा येशू आणि त्यांचे शिष्य भोजन करण्यास बसले. 15मग ते शिष्यांना म्हणाले, “माझ्या दुःख सहन करण्यापूर्वी तुमच्याबरोबर हे वल्हांडणाचे भोजन करावे अशी माझी फार इच्छा होती. 16कारण मी तुम्हाला सांगतो की, परमेश्वराच्या राज्यात याची पूर्तता झाल्याशिवाय मी हे भोजन पुन्हा करणार नाही.”
17नंतर त्यांनी प्याला घेतला, त्याबद्दल उपकार मानले आणि ते म्हणाले, “हा घ्या आणि तुमच्यामध्ये त्याची वाटणी करा. 18मी तुम्हाला सांगतो की, परमेश्वराचे राज्य येईपर्यंत मी पुन्हा द्राक्षवेलीचा उपज पिणार नाही.”
19नंतर येशूंनी भाकर घेतली, आभार मानले आणि ती मोडली आणि ती त्यांना देत असताना म्हणाले, “हे माझे शरीर असून ते तुमच्याकरिता दिले जात आहे; माझ्या स्मरणार्थ हे करा.”
20भोजन झाल्यानंतर येशूंनी द्राक्षारसाचा प्याला हाती घेतला व म्हणाले, “हा प्याला माझ्या रक्ताने केलेला नवा करार आहे, जे रक्त पुष्कळांसाठी ओतले जात आहे.#22:20 रक्त काही मूळप्रतींमध्ये हे दिले जात आहे ओतले जात आहे असे लिहिलेले दिसत नाही. 21पण पाहा, जो माझा विश्वासघात करणार आहे त्याचा हात माझ्याबरोबर या मेजावर आहे. 22परमेश्वराच्या संकल्पाप्रमाणे मानवपुत्र जातो खरा, पण जो मनुष्य त्यांना विश्वासघाताने धरून देत आहे त्याचा धिक्कार असो.” 23हे ऐकून असे कृत्य करणारा आपल्यापैकी कोण असेल, असा प्रश्न ते आपसात विचारू लागले.
24नंतर शिष्यात आपल्यापैकी सर्वात श्रेष्ठ कोण असा वादविवाद सुरू झाला. 25येशू त्यांना म्हणाले, “गैरयहूदी लोकांचे राजे त्यांच्यावर हुकमत चालवितात आणि त्यांच्यावर अधिकार गाजविणारे स्वतःला त्यांचे उपकारकर्ते म्हणतात. 26परंतु तुम्ही त्यांच्यासारखे असू नये. तुमच्यामध्ये जो कोणी श्रेष्ठ होऊ पाहतो, त्याने लहानासारखे झाले पाहिजे आणि जो अधिकार चालवितो त्याने तुमचा सेवक असावे. 27श्रेष्ठ कोण आहे, जो भोजन करतो, की जो सेवा करतो? अर्थात् जो बसून जेवतो तोच ना? पाहा, सेवा करणार्यासारखा मी तुम्हामध्ये आहे. 28माझ्या परीक्षामध्ये माझ्या बाजूने जे उभे राहिले, ते तुम्हीच आहात. 29मी तुम्हाला राज्य बहाल करतो, ज्याप्रमाणे माझ्या पित्याने मला एक राज्य बहाल केले आहे, 30तसेच माझ्या राज्यामध्ये माझ्याबरोबर बसून खातापिता येईल आणि तुम्ही सिंहासनावर बसून इस्राएलाच्या बारा वंशाचा न्यायनिवाडा कराल.
31“शिमोना, शिमोना, तुम्हा सर्वांची गव्हासारखी चाळणी करावी म्हणून सैतानाने विचारले आहे. 32परंतु शिमोना, तुझा विश्वास डळमळू नये म्हणून मी प्रार्थना केली आहे, की तू आपल्या विश्वासात खचू नये. ज्यावेळी तू परत वळशील, त्यावेळी आपल्या बंधुंना बळकट कर.”
33शिमोन म्हणाला, “प्रभुजी, आपल्याबरोबर तुरुंगात जाण्यास व जीव देण्याचीही माझी तयारी आहे.”
34तेव्हा येशूंनी त्याला म्हटले, “पेत्रा, मी तुला निश्चित सांगतो, आज कोंबडा आरवण्यापूर्वी तू तीन वेळा मला नाकारशील.”
35नंतर येशूंनी त्यांना विचारले, “मी तुम्हाला पैशाचे पाकीट, पिशवी किंवा पायतणांचा जोड न घेता पाठविले, तेव्हा तुम्हाला काही कमी पडले का?”
“नाही,” त्यांनी उत्तर दिले.
36यावर येशू त्यांना म्हणाले, “पण आता तुमच्याजवळ झोळी असल्यास ती घ्या आणि पिशवी पण घ्या. तुमच्याजवळ तरवार नसली, तर आपली वस्त्रे विका व ती विकत घ्या. 37कारण माझ्याविषयीचे भविष्य पूर्ण होण्याचा समय आला आहे. ते भविष्य हे: ‘त्याला गुन्हेगार म्हणून गणले गेले.’#22:37 यश 53:12 संदेष्ट्यांनी माझ्याविषयी जे काही लिहून ठेवले आहे; ते सर्व पूर्णतेस जाईल.”
38तेव्हा शिष्य त्यांना म्हणाले, “हे पाहा प्रभू, येथे दोन तरवारी आहेत.”
येशू म्हणाले, “पुरे आहे.”
येशू जैतून डोंगरावर प्रार्थना करतात
39नेहमीप्रमाणे जैतून डोंगराकडे जाण्यासाठी येशू बाहेर पडले आणि त्यांचे शिष्य त्यांच्या मागोमाग गेले. 40तेथे पोहोचल्यावर, ते शिष्यांना म्हणाले, “तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून प्रार्थना करा.” 41नंतर ते त्यांच्यापासून सुमारे दगड फेकला जाईल इतक्या अंतरावर गेले, त्यांनी गुडघे टेकले आणि प्रार्थना केली. 42“हे पित्या, जर तुमची इच्छा असेल, तर हा प्याला माझ्यापासून दूर करा; तरी माझी इच्छा नाही तर तुमची पूर्ण होऊ द्या.” 43तेव्हा स्वर्गातून एक देवदूत त्यांच्यापुढे प्रकट झाला आणि त्यांना सामर्थ्य पुरविले. 44येशू आत्म्यामध्ये इतके व्याकुळ झाले की, त्यांनी अधिक कळकळीने प्रार्थना केली आणि त्यांचा घाम रक्ताच्या थेंबासारखा जमिनीवर पडत होता.#22:44 काही जुन्या प्रतींमध्ये वचन 43 आणि 44 सापडत नाहीत.
45शेवटी प्रार्थना करून उठल्यानंतर, ते आपल्या शिष्यांकडे परत आले, पण तेही दुःखामुळे झोपी गेले होते असे त्यांना आढळले. 46“तुम्ही का झोप घेता?” येशू त्यांना म्हणाले, “तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून उठा आणि प्रार्थना करा.”
येशूंना अटक
47ते बोलत असतानाच लोकांचा मोठा जमाव तेथे आला आणि येशूंच्या बारा शिष्यांपैकी एक, ज्याला यहूदा म्हणत होते तो त्यांना मार्ग दाखवीत होता. तो येशूंचे चुंबन घ्यावयास जवळ आला, 48तेव्हा येशूंनी त्याला म्हटले, “यहूदा चुंबन घेऊन तू मानवपुत्राचा विश्वासघात करतो काय?”
49आता काय होणार हे शिष्यांनी ओळखले आणि येशूंना विचारले, “प्रभुजी, आम्ही तरवार चालवावी काय?” 50तेवढ्यात त्यांच्यातील एकाने प्रमुख याजकाच्या दासावर वार करून त्याचा उजवा कान कापून टाकला.
51येशूंनी शिष्यांना म्हटले, “पुरे करा.” आणि त्यांनी त्या मनुष्याचा कान स्पर्श करून बरा केला.
52नंतर मुख्य याजक, मंदिराच्या द्वारपाळांचे अधिकारी आणि वडीलजन यांना उद्देशून येशूंनी म्हटले, “मी बंडखोरांचे नेत्रृत्व करणारा आहे असे समजून तुम्ही तरवारी व लाठ्या घेऊन आलात काय? 53मी दररोज मंदिराच्या परिसरात तुमच्याबरोबर होतो, पण त्यावेळी तुम्ही मला धरले नाही. परंतु आताही तुमची वेळ आहे, येथे अंधाराची सत्ता आहे.”
पेत्र येशूंना नाकारतो
54शेवटी त्यांनी येशूंना अटक करून महायाजक कयफा याच्या घरी नेले. पेत्र काही अंतरावरुन, त्याच्यामागे चालत होता. 55आणि जेव्हा काहीजणांनी तेथे अंगणाच्या मधोमध शेकोटी पेटवली होती आणि एकत्रित खाली बसले होते, पेत्र त्यांच्याबरोबर खाली बसला. 56एका दासीने त्याला शेकोटीच्या उजेडात बसलेले पाहिले आणि ती त्याच्याकडे निरखून पाहून म्हणाली, “हा मनुष्य येशूंच्या बरोबर होता.”
57पेत्र नकार देत म्हणाला, “बाई, मी त्या माणसाला ओळखत नाही.”
58थोड्या वेळाने दुसर्या एकाने त्याच्याकडे पाहून म्हटले, “तू पण त्यांच्यापैकी एक आहेस.”
“महाराज, मी तो नाही,” पेत्र नाकारून म्हणाला.
59सुमारे तासाभराने आणखी एकाने खात्रीपूर्वक विधान केले व पेत्राला म्हटले, “हा माणूस त्यांच्याबरोबर होता. कारण तो गालील प्रांताचा आहे!”
60हे ऐकून पेत्र त्यांना म्हणू लागला, “अरे माणसा, तू काय बोलतोस हे मला समजत नाही.” तेवढ्यात कोंबडा आरवला. 61प्रभू येशूंनी पेत्राकडे वळून पाहिले तेव्हा त्याच क्षणाला पेत्राला येशूंचे शब्द आठवले, “पेत्रा, कोंबडा आरवण्यापूर्वी तू मला तीन वेळा नाकारशील.” 62पेत्र दूर निघून गेला आणि मोठ्या दुःखाने रडला.
पहारेकरी येशूंची थट्टा करतात
63मग पहारेकर्यांनी त्यांना बुक्क्या मारल्या व त्यांची थट्टा करावयास सुरुवात केली. 64त्यांनी त्यांचे डोळे बांधले आणि म्हटले, “अंतर्ज्ञानाने सांग, तुला कोणी चापट मारली?” 65आणि त्यांनी त्यांची वाटेल तशी निंदा केली व अपमान केला.
न्यायसभेपुढे येशू
66प्रातःकाळ झाल्यावर, लोकांचे वडीलजन, नियमशास्त्राचे शिक्षक आणि दोघेही मुख्य याजक एकत्रित भेटले आणि येशूंना त्यांच्यासमोर आणण्यात आले. 67ते म्हणाले, “जर तू ख्रिस्त आहेस तर तसे सांग.”
पण येशू म्हणाले, “मी हे तुम्हाला सांगितले, तरी तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवणार नाही किंवा 68मी तुम्हाला विचारले तर तुम्ही मला उत्तर देणार नाही. 69परंतु येथून पुढे मानवपुत्राला सर्वसमर्थ परमेश्वराच्या उजवीकडे बसलेला आहे असे पाहाल.”
70त्या सर्वांनी विचारले, “तू परमेश्वराचा पुत्र आहेस काय?”
येशूंनी उत्तर दिले, “तुम्ही म्हणता तसे तो मीच आहे.”
71तेव्हा ते म्हणाले, “आता आपल्याला आणखी साक्षीदारांची काय गरज आहे?” ते आपण स्वतः त्याच्याच तोंडून ऐकले आहे.
Zvasarudzwa nguva ino
लूक 22: MRCV
Sarudza vhesi
Pakurirana nevamwe
Sarudza zvinyorwa izvi
Unoda kuti zviratidziro zvako zvichengetedzwe pamidziyo yako yose? Nyoresa kana kuti pinda
मराठी समकालीन आवृत्ती™, नवीन करार
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे. सर्व अधिकार जगभरात राखीव.
Marathi Contemporary Version™, New Testament
Copyright © 1978, 1982, 2008, 2022 by Biblica, Inc.
Used with permission. All rights reserved worldwide.