लूक 16
16
धूर्त कारभार्याचा दाखला
1येशूंनी आपल्या शिष्यांना सांगितले: “एक श्रीमंत मनुष्य होता, त्याचा कारभारी संपत्तीचा दुरुपयोग करतो असा आरोप त्याच्यावर होता. 2त्याच्या धन्याने त्याला बोलावून विचारले, ‘तुझ्याबद्दल मी हे काय ऐकत आहे? तू तुझ्या कारभाराचा हिशोब कर, कारण आता तू कारभारी म्हणून राहणार नाहीस.’
3“त्या कारभार्याने मनाशी विचार केला, ‘आता मी काय करावे? माझे महाराज माझ्याकडून कारभार काढून घेत आहे! खड्डे खणण्याची तर माझ्यात ताकद नाही, भीक मागण्याची मला लाज वाटते— 4मला समजले आहे की मी काय करावे, म्हणजे मला कारभारावरून काढले, तरी लोक त्यांच्या घरांमध्ये माझे स्वागत करतील.’
5“मग त्याने आपल्या धन्याच्या प्रत्येक कर्जदाराला बोलाविले. त्याने पहिल्यास विचारले, ‘माझ्या धन्याचे तुझ्यावर किती कर्ज आहे?’
6“तो म्हणाला, ‘नऊशे बथ जैतुनाचे तेल.#16:6 अंदाजे तीन हजार लीटर’ ”
यावर कारभारी म्हणाला, “हा तुझा सहीचा करारनामा घे आणि तो फाडून टाक, व दुसरा करारनामा घेऊन त्यावर चारशे पन्नास आकडा मांड.
7“नंतर त्याने दुसर्याला विचारले, ‘तुझ्यावर किती कर्ज आहे?’
“ ‘एक हजार पोती#16:7 अंदाजे 30 टन गहू,’ तो म्हणाला.
“त्याने त्याला सांगितले ‘हा तुझा करारनामा घे आणि त्यावर फक्त आठशे पोती लिही.’
8“त्या लबाड कारभार्याची ही धूर्तता पाहून धन्याने त्याची वाहवा केली. या जगाचे लोक त्यांच्यासारख्यांशी व्यवहार करताना फार धूर्ततेने वागतात. प्रकाशाच्या लोकांना मात्र तसे वागता येत नाही. 9जगातील संपत्ती आपल्याला मित्र मिळविण्यासाठी वापरा म्हणजे ज्यावेळेस ती नाहीशी होईल तेव्हा तुम्हाला सार्वकालिक घरामध्ये निश्चितपणे प्रवेश मिळेल.
10“जर तुम्ही अगदी लहान गोष्टींत विश्वासू राहिला तर पुष्कळ गोष्टींत विश्वासू असाल, जर कोणी अगदी लहान गोष्टीत अप्रामाणिक राहिला तर पुष्कळ गोष्टीत अप्रामाणिक असेल. 11तुम्ही ऐहिक संपत्ती हाताळण्यासंबधी प्रामाणिक नसाल, तर खरी संपत्ती कोण तुम्हाला सोपवून देईल? 12तुम्ही इतर लोकांच्या संपत्ती संबंधी विश्वासू नसाल, तर तुम्हाला स्वतःची संपत्ती कोण देईल?
13“कोणी दोन धन्यांची चाकरी करू शकत नाही. तुम्ही एकाचा द्वेष कराल आणि दुसर्यावर प्रीती कराल किंवा एकाला समर्पित असाल आणि दुसर्याला तुच्छ मानाल. तुम्हाला परमेश्वराची आणि धनाची सेवा एकाच वेळी करता येणार नाही.”
14हे ऐकून परूश्यांनी त्यांचा उपहास केला, कारण ते पैशावर प्रेम करत होते. 15येशू त्यांना म्हणाले, “तुम्ही स्वतःस दुसर्यांच्या दृष्टीने नीतिमान ठरविणारे आहात, परंतु परमेश्वर तुमचे हृदय जाणून आहे. लोक ज्याला महत्त्व देतात त्या गोष्टी परमेश्वराच्या दृष्टीने तुच्छ आहेत.
अतिरिक्त शिक्षण
16“योहान येईपर्यंत मोशेचे नियमशास्त्र आणि संदेष्टे होते त्या वेळेपासून परमेश्वराच्या राज्याची शुभवार्ता गाजविली जात आहे आणि प्रत्येकजण आत जाण्याचा नेटाने प्रयत्न करीत आहे. 17नियमशास्त्रातील एकही शब्द अथवा कानामात्रा काढून टाकणे यापेक्षा आकाश व पृथ्वी नाहीशी होणे हे सोपे आहे.
18“जो कोणी आपल्या पत्नीला सूटपत्र देतो आणि दुसर्या स्त्रीशी लग्न करतो, तो व्यभिचार करतो आणि जो पुरुष सूटपत्र दिलेल्या स्त्रीसोबत विवाह करतो तो व्यभिचार करतो.”
श्रीमंत मनुष्य व लाजर
19येशू म्हणाले, “कोणी एक श्रीमंत मनुष्य होता. तो दररोज जांभळी आणि सुंदर वस्त्रे परिधान करीत असे आणि चैनीत राहत असे. 20त्याच्या फाटकाजवळ लाजर नावाचा भिकारी पडून होता, तो फोडांनी भरलेला होता. 21त्या श्रीमंत मनुष्याच्या मेजावरून खाली पडलेला चुरा मिळावा या आशेने तो तिथे पडलेला असताना कुत्री येऊन त्याचे फोड चाटीत असत.
22“अशी वेळ आली की तो भिकारी मरण पावला आणि दूतांनी त्याला अब्राहामाजवळ नेले. श्रीमंत मनुष्यही मरण पावला, तेव्हा त्याला पुरण्यात आले. 23आणि त्याचा आत्मा अधोलोकात गेला. तिथे तो यातना भोगीत असताना, तिथून त्याने दूर अंतरावर लाजराला अब्राहामाच्या जवळ असलेले पाहिले. 24त्याने त्याला हाक मारली, ‘हे पित्या अब्राहामा, माझ्यावर दया करून लाजराला पाठीव यासाठी की त्याने आपल्या बोटाचे टोक पाण्यात बुडवून माझी जीभ थंड करावी, कारण या अग्निज्वालांमध्ये मी कासावीस झालो आहे.’
25“परंतु अब्राहामाने उत्तर दिले, ‘मुला, तुझ्या आयुष्यात तुला चांगल्या गोष्टी मिळाल्या, पण लाजराला वाईट गोष्टी मिळाल्या, म्हणून तो आता सांत्वन पावत आहे आणि तू क्लेश भोगीत आहेस. 26आणि याव्यतिरिक्त, आमच्या आणि तुमच्यामध्ये एक मोठी दरी स्थापलेली आहे, जे येथून तुझ्याकडे जाण्याची इच्छा करतात ते जाऊ शकत नाहीत किंवा तिथून आम्हापर्यंत ती दरी ओलांडून कोणीही येऊ शकत नाही.’
27“तो म्हणाला, ‘मग हे पित्या, मी तुम्हाला विनवितो की, लाजाराला माझ्या कुटुंबाकडे पाठवा. 28कारण मला पाच भाऊ आहेत. ते सुद्धा या यातना स्थळी येऊ नयेत, म्हणून त्याने त्यांना सावध करावे.’
29“पण अब्राहामाने उत्तर दिले, ‘त्यांच्याजवळ मोशे आणि संदेष्टे आहेत त्यांचे त्यांनी ऐकावे.’
30“ ‘हे पित्या अब्राहामा, असे नाही. परंतु मृतातून त्यांच्याकडे कोणी गेले तर, ते पश्चात्ताप करतील.’
31“अब्राहाम त्याला म्हणाला, ‘ते मोशे किंवा संदेष्ट्यांचे ऐकत नाहीत, तर मृतातून जिवंत होऊन कोणी गेला, तरी ते निश्चितच ऐकणार नाहीत.’ ”
موجودہ انتخاب:
लूक 16: MRCV
سرخی
شئیر
کاپی
کیا آپ جاہتے ہیں کہ آپ کی سرکیاں آپ کی devices پر محفوظ ہوں؟ Sign up or sign in
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.