उत्पत्ती 1
1
प्रारंभ
1परमेश्वराने प्रथम आकाश व पृथ्वी निर्माण केली. 2आता पृथ्वी निराकार आणि रिकामी होती, खोलवर अंधार पसरला होता आणि परमेश्वराचा आत्मा पाण्यावर पाखर घालीत होता.
3नंतर परमेश्वराने म्हटले: “प्रकाश होवो” आणि प्रकाश झाला. 4परमेश्वराने पाहिले की, प्रकाश चांगला आहे आणि त्यांनी अंधारापासून प्रकाश वेगळा केला. 5परमेश्वराने प्रकाशाला “दिवस” आणि अंधाराला “रात्र” असे नाव दिले आणि संध्याकाळ झाली व सकाळ झाली; हा पहिला दिवस.
6पुन्हा परमेश्वराने म्हटले, “जलाशयाच्या मध्यभागी अंतराळ होवो आणि ते जलापासून जलांची विभागणी करो.” 7परमेश्वराने अंतराळ निर्माण केले व अंतराळाच्या वरचे जल आणि खालचे जल अशी विभागणी केली आणि तसे घडून आले. 8परमेश्वराने अंतराळास “आकाश” असे नाव दिले आणि संध्याकाळ झाली व सकाळ झाली; हा दुसरा दिवस.
9नंतर परमेश्वराने म्हटले: “अंतराळाखालील जले एकत्र येवो व कोरडी जमीन दृष्टीस पडो” आणि तसे घडून आले. 10परमेश्वराने कोरड्या जमिनीस “भूमी” व जलांच्या संचयास “सागर” अशी नावे दिली. परमेश्वराने पाहिले की, हे चांगले आहे.
11मग परमेश्वराने म्हटले, “भूमीतून वनस्पतीचा उपज होवो: निरनिराळी रोपे व झाडे, फळे देणारी व त्या फळातच स्वजातीचे बीज असणार्या फळझाडांचा भूमीतून उपज होवो” आणि तसे घडून आले. 12भूमीने वनस्पतीचा उपज केला: फळे देणारी व त्या फळातच स्वजातीचे बीज असणारी फळझाडे भूमीने उपजविली. परमेश्वराने पाहिले की हे चांगले आहे. 13आणि संध्याकाळ झाली व सकाळ झाली; हा तिसरा दिवस.
14त्यानंतर परमेश्वराने म्हटले: “दिवस आणि रात्र वेगळी करण्यासाठी आकाशात ज्योती होवोत व त्या ॠतू, दिवस आणि वर्षे दाखविणारी चिन्हे होवोत. 15पृथ्वीला प्रकाश देण्यासाठी त्या ज्योती आकाशमंडळात दीप होवोत” आणि तसे घडून आले. 16परमेश्वराने दोन मोठ्या ज्योती निर्माण केल्या—दिवसावर प्रभुत्व चालविण्यासाठी प्रखर आणि रात्रीवर प्रभुत्व चालविण्यासाठी सौम्य प्रकाश. त्यांनी तारेही निर्माण केले. 17परमेश्वराने त्या ज्योती पृथ्वीवर प्रकाश पाडण्यासाठी आकाशमंडळात ठेवल्या, 18दिवसावर व रात्रीवर प्रभुत्व चालविण्यासाठी आणि प्रकाश व अंधार वेगळे करण्यासाठी या ज्योती त्यांनी निर्माण केल्या. परमेश्वराने पाहिले की हे चांगले आहे. 19आणि संध्याकाळ झाली व सकाळ झाली; हा चौथा दिवस.
20आणि परमेश्वराने म्हटले, “जलांमध्ये विपुल प्रमाणात जीवजंतू उत्पन्न होवोत आणि पक्षी पृथ्वीवर आकाशमंडळात विहार करोत.” 21सागरांमधील महाकाय प्राणी, तसेच जलांमध्ये संचार करणारे व सर्व जातीचे प्राणी त्यांनी उत्पन्न केले. तसेच पंख असलेले सर्व जातीचे पक्षीही त्यांनी उत्पन्न केले. परमेश्वराने पाहिले की हे चांगले आहे. 22परमेश्वराने त्यांना आशीर्वाद दिला आणि ते म्हणाले, “फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, समुद्रातील जले भरून टाका आणि पृथ्वीवर पक्ष्यांची वृद्धी होवो.” 23आणि संध्याकाळ झाली व सकाळ झाली; हा पाचवा दिवस.
24मग परमेश्वराने म्हटले, “प्रत्येक जातीच्या जिवंत प्राण्याची निर्मिती होवो: गुरे, जमिनीवरील सरपटणारे प्राणी, वनपशू यांच्या सर्व जाती पृथ्वीवर अस्तित्वात येवोत” आणि तसे घडून आले. 25परमेश्वराने वन्यप्राणी, पाळीव जनावरे, जमिनीवर सरपटत जाणारे सर्व प्राणी, त्यांच्या जाती प्रमाणे त्यांनी निर्माण केले आणि परमेश्वराने पाहिले की ते चांगले आहे.
26मग परमेश्वराने म्हटले: “आपल्यासारखी, आपल्या प्रतिरूपाची मानवजात आपण निर्माण करू या. समुद्रातील मासे आणि आकाशातील पक्षी, गुरे, सर्व वनपशू#1:26 इतर काही हस्तलिखितांनुसार पृथ्वी आणि जमिनीवर सरपटणार्या प्रत्येक प्राण्यांवर त्यांनी सत्ता चालवावी.”
27याप्रमाणे परमेश्वराने आपल्या प्रतिरूपाची मानवजात निर्माण केली.
त्यांनी आपल्या प्रतिरूपातच त्यांना निर्माण केले.
पुरुष व स्त्री असे त्यांनी निर्माण केले.
28मग परमेश्वराने त्यांना आशीर्वाद दिला आणि ते त्यांना म्हणाले, “फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा आणि पृथ्वी व्यापून टाका; ती आपल्या सत्तेखाली आणा. समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी आणि पृथ्वीवर संचार करणार्या प्रत्येक सजीव प्राण्यावर अधिकार गाजवा.”
29मग परमेश्वर म्हणाले, “पाहा, भूतलावर बीज देणारी प्रत्येक वनस्पती आणि फळांमध्येच वृक्ष निर्माण करणारे बीज असलेले प्रत्येक फळझाड मी तुम्हाला दिले आहे. ती तुमचे अन्न होतील. 30त्याप्रमाणे पृथ्वीतलावरील सर्व पशू, आकाशातील प्रत्येक पक्षी, तसेच जमिनीवर सरपटत जाणारा, जीवनाचा श्वास असलेला प्रत्येक प्राणी—यांना अन्न म्हणून मी हिरवी वनस्पती देत आहे” आणि तसे घडून आले.
31परमेश्वराने आपण निर्माण केलेली प्रत्येक गोष्ट पाहिली आणि ती अतिशय चांगली होती आणि संध्याकाळ झाली व सकाळ झाली; हा सहावा दिवस.
موجودہ انتخاب:
उत्पत्ती 1: MRCV
سرخی
شئیر
کاپی
کیا آپ جاہتے ہیں کہ آپ کی سرکیاں آپ کی devices پر محفوظ ہوں؟ Sign up or sign in
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.