योहान 9

9
जन्मांधाला दृष्टिदान
1रस्त्याने जात असता येशूने एका जन्मांध माणसाला पाहिले. 2तेव्हा त्याच्या शिष्यांनी त्याला विचारले, “गुरुवर्य, कोणी पाप केले, ह्याने की ह्याच्या आईबापांनी, म्हणून हा असा आंधळा जन्मला?”
3येशूने उत्तर दिले, “ह्याने किंवा ह्याच्या आईबापांनी पाप केले म्हणून नव्हे, पण ह्याच्याठायी देवाचे कार्य दिसावे ह्यासाठी. 4ज्याने मला पाठवले त्याची कामे मी दिवस आहे तोपर्यंत केली पाहिजेत. रात्र येणार आहे, मग कोणालाही काम करता येणार नाही. 5मी जगात आहे तोपर्यंत मी जगाचा प्रकाश आहे.”
6असे बोलून तो जमिनीवर थुंकला. थुंकीने त्याने माती ओली केली व ती त्या आंधळ्या माणसाच्या डोळ्यांना लावली 7आणि त्याला म्हटले, “जा, शिलोह (म्हणजे पाठवलेला) नावाच्या तळ्यावर तुझा चेहरा धुऊन घे.” त्याने जाऊन त्याचा चेहरा धुतला. त्याला दिसू लागले व तो परत आला.
8हे पाहून त्याचे शेजारी व ज्यांनी त्याला पूर्वी भिक्षा मागताना पाहिले होते ते म्हणाले, “भीक मागत बसणारा तो हाच नाही का?”
9कित्येक म्हणाले, “तोच हा.” दुसरे म्हणाले, “नाही, हा त्याच्यासारखा दिसतो.” तेव्हा तो स्वतः म्हणाला, “मी तोच आहे.”
10त्यांनी त्याला विचारले, “तुला कसे दिसू लागले?”
11त्याने उत्तर दिले, “येशू नावाच्या मनुष्याने माती ओली करून माझ्या डोळ्यांना लावली आणि मला सांगितले, ‘शिलोहवर जाऊन धुऊन घे.’ मी जाऊन धुतले आणि मला दिसू लागले.”
12त्यांनी त्याला विचारले, “तो कुठे आहे?” तो म्हणाला, “मला ठाऊक नाही.”
13जो पूर्वी आंधळा होता, त्याला त्यांनी परुश्यांकडे नेले. 14ज्या दिवशी येशूने माती ओली करून त्याचे डोळे उघडले तो साबाथ होता. 15म्हणून परुश्यांनीदेखील त्याला पुन्हा विचारले, “तुला दृष्टी कशी मिळाली?” तो त्यांना म्हणाला, “येशूने माझ्या डोळ्यांना ओली माती लावली, ती मी धुऊन टाकल्यावर मला दिसू लागले.”
16तेव्हा परुश्यांतील कित्येक म्हणाले, “हा मनुष्य देवाकडचा नाही कारण तो साबाथ पाळत नाही.” दुसरे म्हणाले, “पापी मनुष्य अशी चिन्हे कशी करू शकतो?” अशी त्यांच्यामध्ये फूट पडली.
17म्हणून पुन्हा त्यांनी त्या आंधळ्या माणसाला विचारले, “ज्याने तुला दृष्टी दिली त्याच्याविषयी तुला काय वाटते?” त्याने म्हटले, “तो संदेष्टा आहे.”
18यहुदी अधिकाऱ्यांनी त्या दृष्टी मिळालेल्या माणसाच्या आईबापांना बोलावून विचारपूस करीपर्यंत, तो पूर्वी आंधळा होता व आता त्याला दृष्टी मिळाली आहे, ह्यावर विश्‍वास ठेवला नाही. 19त्यांनी त्यांना विचारले, “तुमचा जो मुलगा आंधळा जन्मला असे म्हणता, तो हाच का? मग आता त्याला दृष्टी कशी मिळाली?”
20त्याच्या आईबापांनी उत्तर दिले, “हा आमचा मुलगा आहे व तो आंधळा जन्मला, हे आम्हांला ठाऊक आहे, 21मात्र आता त्याला दृष्टी कशी मिळाली, हे आम्हांला ठाऊक नाही, किंवा त्याचे डोळे कोणी उघडले, हेदेखील आम्हांला ठाऊक नाही, त्याला विचारा. तो वयात आलेला आहे. तो स्वतःविषयी सांगेल.” 22त्याच्या आईबापांना यहुदी अधिकाऱ्यांचे भय वाटत होते म्हणून ते असे म्हणाले; कारण हा ख्रिस्त आहे, असे जो कोणी जाहीर करील त्याला सभास्थानातून बहिष्कृत करावे, असे यहुदी अधिकाऱ्यांचे अगोदरच एकमत झाले होते. 23ह्यामुळे त्याच्या आईबापांनी म्हटले, ‘तो वयात आलेला आहे, त्याला विचारा.’
24जो मनुष्य पूर्वी आंधळा होता, त्याला त्यांनी दुसऱ्यांदा बोलावून म्हटले, “देवाचा गौरव कर. तो मनुष्य पापी आहे, हे आम्हांला ठाऊक आहे.”
25त्याने उत्तर दिले, “तो पापी आहे किंवा नाही हे मला ठाऊक नाही पण मला एक गोष्ट ठाऊक आहे की, मी पूर्वी आंधळा होतो व आता मला दिसते.”
26त्यांनी त्याला विचारले, “त्याने तुला काय केले? तुला दृष्टी कशी मिळाली?”
27त्याने त्यांना उत्तर दिले, “नुकतेच मी तुम्हांला सांगितले तरी तुम्ही ऐकले नाही, तुम्ही पुन्हा ऐकायची इच्छा का धरता? तुम्हीही त्याचे शिष्य होऊ इच्छिता का?”
28तेव्हा त्यांनी त्याची हेटाळणी करून म्हटले, “तू त्याचा शिष्य आहेस, आम्ही तर मोशेचे शिष्य आहोत.” 29“देव मोशेबरोबर बोलला आहे, हे आम्हांला ठाऊक आहे, परंतु तो मनुष्य कुठला आहे हे आम्हांला ठाऊकदेखील नाही!”
30त्या माणसाने त्यांना उत्तर दिले, “हेच तर किती विचित्र आहे! तो कुठला आहे, हे तुम्हांला ठाऊक नाही, पण त्याने तर माझे डोळे उघडले. 31आपल्याला ठाऊक आहे की, देव पापी लोकांचे ऐकत नाही, तर जो कोणी देवाची आराधना करतो व त्याच्या इच्छेप्रमाणे आचरण करतो, त्याचे तो ऐकतो. 32जन्मांधाचे डोळे उघडल्याचे जगाच्या आरंभापासून कधी ऐकण्यात आले नव्हते. 33जर हा मनुष्य देवाकडचा नसता, तर ह्याला काही करता आले नसते.”
34त्यांनी त्याला म्हटले, “तू पापात जन्मलास व पापात वाढलास आणि आम्हांला शिकवतोस काय?” मग त्यांनी त्याला हाकलून लावले.
35त्यांनी त्याला बाहेर घालवले हे येशूने ऐकले, तेव्हा त्याने त्याला शोधून काढले व म्हटले, “तू मनुष्याच्या पुत्रावर विश्वास ठेवतोस का?”
36त्याने उत्तर दिले, “प्रभो, मी त्याच्यावर विश्वास ठेवावा असा तो कोण आहे?”
37येशूने त्याला म्हटले, “तू त्याला पाहिले आहेस व तोच तुझ्याबरोबर आता बोलत आहे.”
38तो म्हणाला, “प्रभो, मी विश्वास ठेवतो” आणि त्याने त्याची आराधना केली.
39तेव्हा येशू म्हणाला, “मी ह्या जगात न्यायनिवाड्यासाठी आलो आहे, ह्यासाठी की, ज्यांना दिसत नाही त्यांना दिसावे आणि ज्यांना दिसते त्यांनी आंधळे व्हावे.”
40परुश्यांतील जे त्याच्याजवळ होते, त्यांनी हे ऐकून त्याला विचारले, “आम्हीही आंधळे आहोत काय?”
41येशू त्यांना म्हणाला, “तुम्ही आंधळे असता, तर तुम्हांला दोषी ठरवण्यात आले नसते, परंतु तुम्हांला दिसते असे तुम्ही म्हणता, म्हणून तुमचा दोष तसाच राहतो.”

Àwon tá yàn lọ́wọ́lọ́wọ́ báyìí:

योहान 9: MACLBSI

Ìsàmì-sí

Pín

Daako

None

Ṣé o fẹ́ fi àwọn ohun pàtàkì pamọ́ sórí gbogbo àwọn ẹ̀rọ rẹ? Wọlé pẹ̀lú àkántì tuntun tàbí wọlé pẹ̀lú àkántì tí tẹ́lẹ̀

Àwọn ètò kíkà ọ̀fé àti àyọkà tó ní ṣe pẹ̀lú योहान 9

YouVersion nlo awọn kuki lati ṣe adani iriri rẹ. Nipa lilo oju opo wẹẹbu wa, o gba lilo awọn kuki wa gẹgẹbi a ti ṣalaye ninu Eto Afihan wa