मत्तय 3
3
बाप्तिस्मा करणारा योहान मार्ग तयार करतो
1त्याच दिवसात, बाप्तिस्मा करणारा योहान आला व यहूदीयाच्या अरण्यात गेला व लोकांना संदेश देऊ लागला, 2“पश्चात्ताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे.” 3तो हाच आहे ज्याच्याबद्दल संदेष्टा यशया बोलला होता:
“अरण्यात घोषणा करणार्या एकाची वाणी झाली,
‘प्रभुसाठी मार्ग तयार करा,
त्यांच्यासाठी मार्ग सरळ करा.’ ”#3:3 यश 40:3
4योहानाचा पोशाख उंटाच्या केसांपासून तयार केलेला आणि त्याच्या कंबरेला चामड्याचा पट्टा बांधलेला होता. त्याचे भोजन टोळ आणि वनमध होते. 5यरुशलेम, सर्व यहूदीया आणि यार्देन प्रांतातील प्रत्येक भागातून लोक त्यांच्याकडे आले. 6त्यांनी पापे कबूल केल्यानंतर यार्देन नदीमध्ये योहानाकडून त्यांचा बाप्तिस्मा केला जात असे.
7परंतु पुष्कळ परूशी#3:7 परूशी अर्थात् कडक यहूदी, मोशेचे नियमशास्त्र पाळणारे व सदूकी#3:7 सदूकी हे असे लोक होते जे पुनरुत्थान व देवदूत यावर विश्वास ठेवीत नव्हते लोक त्यांच्याकडे बाप्तिस्मा घेण्याच्या विचाराने येऊ लागले, तेव्हा तो त्यांना म्हणाला, “अहो सापांच्या पिलांनो, येणार्या क्रोधापासून पळून जाण्यास तुम्हाला कोणी सावध केले? 8जा, पश्चात्तापाला साजेल अशी कृत्ये करा. 9आमचा पिता तर अब्राहाम आहे असे आपल्या मनात म्हणू नका. कारण मी तुम्हाला सांगतो की, परमेश्वर या दगडांपासून देखील अब्राहामासाठी संतती निर्माण करण्यास समर्थ आहे. 10कुर्हाड अगोदरच झाडांच्या मूळावर ठेवलेली आहे. प्रत्येक झाड जे चांगले फळ देत नाही ते तोडले जाईल आणि अग्नीत टाकण्यात येईल.”
11योहान म्हणाला “पश्चातापासाठी मी तुमचा पाण्याने बाप्तिस्मा करतो, परंतु ज्यांची पादत्राणे वाहण्यासही माझी पात्रता नाही,#3:11 त्या काळात मालकाचे पादत्राण वाहण्याचे काम गुलामाचे होते मार्क 1:7 जे माझ्यापेक्षा फार सामर्थ्यवान आहेत, असे दुसरे कोणीतरी येत आहे. ते तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने आणि अग्निने करतील. 12खळे स्वच्छ करण्यास त्यांच्या हातात धान्य पाखडण्याचे सूप आहे, ते गहू कोठारात साठवतील आणि न विझणार्या अग्निमध्ये भुसा जाळून टाकतील.”
येशूंचा बाप्तिस्मा
13तेव्हा योहानाकडून बाप्तिस्मा घ्यावा यासाठी येशू गालील प्रांतामधून यार्देन नदीवर आले. 14पण योहान त्यांना नकार देत म्हणाला, “वास्तविक मीच तुमच्या हातून बाप्तिस्मा घेतला पाहिजे, मग तुम्ही माझ्याकडे बाप्तिस्मा घेण्यास का आलात?”
15येशू त्याला म्हणाले, “आता असेच होऊ दे, कारण सर्व नीतिमत्व अशाप्रकारे पूर्ण करणे आपल्याला योग्य आहे.” तेव्हा योहानाने त्यांचा बाप्तिस्मा केला.
16येशूंचा बाप्तिस्मा झाल्याबरोबर ते पाण्यातून वर आले. त्याक्षणीच स्वर्ग उघडला आणि त्यांनी परमेश्वराचा आत्मा कबुतरासारखा आपल्यावर उतरताना आणि स्थिरावताना पाहिला; 17आणि स्वर्गातून वाणी झाली, “तू माझा पुत्र, माझा प्रिय; तुझ्यावर मी संतुष्ट आहे.”
Àwon tá yàn lọ́wọ́lọ́wọ́ báyìí:
मत्तय 3: MRCV
Ìsàmì-sí
Pín
Daako
Ṣé o fẹ́ fi àwọn ohun pàtàkì pamọ́ sórí gbogbo àwọn ẹ̀rọ rẹ? Wọlé pẹ̀lú àkántì tuntun tàbí wọlé pẹ̀lú àkántì tí tẹ́lẹ̀
मराठी समकालीन आवृत्ती™, नवीन करार
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे. सर्व अधिकार जगभरात राखीव.
Marathi Contemporary Version™, New Testament
Copyright © 1978, 1982, 2008, 2022 by Biblica, Inc.
Used with permission. All rights reserved worldwide.