जी चिन्हे त्या पहिल्या श्वापदासमक्ष करण्याचे त्याच्याकडे सोपवले होते, त्यावरून त्याने पृथ्वीवर राहणाऱ्यांना ठकवले, म्हणजे तलवारीचा घाव लागला असताही जिवंत राहिलेल्या श्वापदाची मूर्ती करण्यास पृथ्वीवर राहणाऱ्यांना त्याने फसवले. पहिल्या श्वापदाच्या मूर्तीत प्राण घालण्याची त्याला मुभा देण्यात आली होती, ह्यासाठी की, श्वापदाच्या मूर्तीने बोलावे आणि जे कोणी त्या श्वापदाच्या मूर्तीची आराधना करणार नाहीत ते ठार मारले जावेत, असे तिने घडवून आणावे.